उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांना मोर्चाने निवेदन; ‘आश्वासन नको, आता निर्णय हवा’
दौलतराव पिसाळ, वाई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाई तालुक्यातील सकल मराठा समाजाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. वाई शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. मेडिकल सेवा वगळता दुकाने, हॉटेल्स, रस्त्यालगतच्या व्यावसायिक आस्थापना तसेच विविध व्यवसाय बंद ठेवण्यात आले. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी वाई शहर दुमदुमून गेले.

बंदनंतर मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घेऊन मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला गंभीर धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला दहा दिवस उलटूनही शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. काही दिवसांपूर्वी शासनाचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेऊन गेले होते. मात्र, त्यानंतरही मागण्यांवर निर्णय न झाल्याने ‘आश्वासन नको, आता निर्णय हवा’, अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली.
आंदोलनस्थळी बोलताना मराठा समन्वयक तथा वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी कुणबी नोंदी, कुणबी दाखले आणि गॅझेटच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. वाई तालुक्यात यापूर्वीच्या कुणबी नोंदींच्या आधारे सुमारे हजार ते दीड हजार नागरिकांनी कुणबी दाखले काढल्याचा दावा त्यांनी केला. या दाखल्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
वाई तालुक्यातील मोठा वर्ग शेतीवर अवलंबून आहे. भावाभावांमध्ये जमिनीचे विभाजन होत गेल्याने अनेक कुटुंबांच्या वाट्याला एक-दोन एकर जमीन उरली आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च करणे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांना कठीण जात आहे. गुण असूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येत असल्याचे सावंत यांनी सांगितले. आरक्षणामुळे विद्यार्थ्यांना कमी शुल्कात चांगल्या महाविद्यालयात शिक्षण घेण्याची आणि पुढे रोजगाराच्या संधी मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘संपूर्ण समाजाचा पोशिंदा आणि आदरस्तंभ असलेला मराठा समाज आज आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे, यापेक्षा दुर्दैव कोणते?’ असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला. आपण कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर समाजाचा कार्यकर्ता म्हणून आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील विविध समित्या, समाजाचे ग्रुप आणि कार्यकर्ते एकत्रितपणे काम करत असल्याचे सांगत समाजाची एकजूट हीच आंदोलनाची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ११ तारखेला मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासाठी तालुक्यातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चरण गायकवाड यांनी केले. मुंबईतील लढा निर्णायक मानून प्रत्येकाने तयारीत राहावे, असे त्यांनी सांगितले. काशिनाथ मामा शेलार यांच्या वतीने महिलांसह प्रत्येक कुटुंबाने मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. ‘आज नाही तर कधीच नाही; समाजाचे भविष्य आपल्या हातात आहे. एकीची मूठ बांधा आणि सरकारला जाब विचारा’, असा निर्धार नारायण ढगे यांनी व्यक्त केला.
गोविंद इथापे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत कुणबी नोंदी आणि कुणबी दाखल्यांचा लाभ किती नागरिकांना मिळाला, याची माहिती प्रशासनाने स्पष्ट करावी, अशी मागणी केली. वारंवार आंदोलन करण्याची वेळ समाजावर येत असल्याने आता हा शेवटचा आणि निर्णायक लढा ठरला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. बंदला व्यापारी वर्गाने दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी व्यापाऱ्यांचे आभार मानले.
महिला समन्वयक अल्पना यादव यांनीही शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना ७० ते ८० टक्के गुण मिळूनही आर्थिक अडचणींमुळे पुढील शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांचे शिक्षण, रोजगार आणि भवितव्य सुरक्षित करण्यासाठी मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. ‘मत मागण्यासाठी सरकार दारोदारी येते, मग मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी वेळ का लागतो?’ असा सवालही आंदोलनातून करण्यात आला.
वाई शहरातील बंदला व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. डी-मार्टसह अनेक मोठ्या आस्थापनांनीही व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याचे आंदोलकांनी सांगितले. हायवेवरील दुकानेही बंद राहिली. मात्र, श्रावणी सोमवारनिमित्त महागणपती परिसरात विविध भागांतून पालख्या येत असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्या परिसरातील दुकानदारांना बंदमधून सूट देण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी महागणपतीला साकडे घालण्यासाठी रात्री सात वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाई शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आता ११ सप्टेंबरच्या मुंबई आंदोलनाकडे वाई तालुक्यातील सकल मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
आंदोलनात अनिल सावंत, काशिनाथ शेलार, चरण गायकवाड, प्रमोद अनपट, अल्पना यादव, विक्रम वाघ, नारायण ढगे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले. अमित वाघ यांनी आभार मानले. तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या विविध समन्वयकांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला.
युवा पिढीसाठी त्यागाची गरज
‘मराठा समाजाने येणाऱ्या युवा पिढीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आजच्या त्यागातूनच उद्याची पिढी घडणार आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाने एकजूट राहणे आवश्यक आहे. आजच्या आंदोलनाला मोजकेच मावळे उपस्थित असले तरी आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले,’ असे मराठा समन्वयक वाई तालुका काशिनाथ शेलार यांनी सांगितले.











