ओडिशापासून सांगलीपर्यंत गांजा तस्करीचे धागे | तब्बल ६३५ किलो गांजाच्या तपासात आरोपीची भूमिका पोलिसांच्या रडारवर
बारामती : जळोचीतील निर्जन शेतात दोन ड्रममध्ये तब्बल ४७८ किलो ९५० ग्रॅम गांजा सापडल्यानंतर बारामती शहर पोलिसांसमोर उभ्या राहिलेल्या ‘या गांजामागे कोण?’ या प्रश्नाचे उत्तर आता तपासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. या प्रकरणातील विकी विजय कांबळे याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मात्र, कांबळे हाच या संपूर्ण गांजा रॅकेटचा सूत्रधार आहे का, की तो मोठ्या साखळीतील केवळ एक दुवा आहे? हा प्रश्न अद्याप तपासाचा विषय आहे. पोलिसांनीही त्याची भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगत पुढील तपास सुरू ठेवला आहे. जळोचीतील दोन ड्रमपासून सुरू झालेला तपास ओडिशापर्यंत पोहोचला असून सांगलीतही कांबळेच्या ताब्यातून १३४ किलो गांजा जप्त झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
दोन ड्रममध्ये अर्धा टन गांजा; पण मालक कोण?
२८ फेब्रुवारी रोजी जळोची-पिंपळी रोड परिसरातील एका शेतात मोठ्या प्रमाणावर गांजा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता ‘समृद्धी Aqua’चे १५०० लिटर क्षमतेचे दोन मोठे प्लास्टिक ड्रम आढळून आले.
ड्रम उघडताच पोलिसांनाही धक्का बसला. त्यामध्ये तब्बल ४६५ पॅकेट्समध्ये ४७८.९५० किलो गांजा आढळला. या गांजाची अंदाजे किंमत २ कोटी ३९ लाख ४७ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा निर्जन शेतात आणून ठेवण्यात आला होता. मात्र ड्रम कोणाचे? गांजा कोणी आणला? कुठून आला? तो कोणासाठी होता? पुढे कुठे जाणार होता? या प्रश्नांची उत्तरे त्यावेळी पोलिसांसमोर नव्हती.
याच प्रश्नांच्या उत्तरासाठी बारामती शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. ‘ड्रम’ बोलले नाहीत; मोबाईल आणि सीसीटीव्ही बोलू लागले! गुन्ह्याचा तपास केवळ पारंपरिक पद्धतीने न करता पोलिसांनी CDR, Dump Data, IMEI Mapping, मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज, वाहनांच्या हालचाली आणि संशयितांमधील संपर्क यांचे विश्लेषण केले. या तपासातून प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे, समाधान धर्मराज गायकवाड, प्रिन्सकुमार मुन्ना सिंग, राहुल कल्याण गोरे, विकी विजय कांबळे, संग्राम उर्फ चंदन सिंग आणि जॉकी माझी यांची नावे तपासाच्या कक्षेत आली.
यापैकी काही आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीची तांत्रिक आणि इतर पुराव्यांच्या आधारे पडताळणी करण्यात आली. तपास पुढे सरकत असताना विकी कांबळेचा ओडिशातील जॉकी माझी याच्याशी संपर्क असल्याचा धागा पोलिसांच्या हाती लागला. संग्राम उर्फ चंदन सिंग याची भूमिकाही तपासली जात आहे. त्यामुळे जळोचीतील दोन ड्रममधील गांजा हा स्थानिक पातळीवरील व्यवहार नसून ओडिशा ते महाराष्ट्र अशी आंतरराज्यीय पुरवठा साखळी असण्याची शक्यता पोलिसांच्या तपासातून पुढे आली.
सांगलीत १३४ किलो गांजासह पकडला..
या तपासाला आणखी महत्त्वाचा वळण मिळाले ते सांगलीत. विकी कांबळेच्या हालचालींबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर सांगली पोलिसांना सतर्क करण्यात आले. त्यानंतर सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि कुपवाड MIDC पोलिसांनी संशयित इनोव्हा वाहनाचा पाठलाग केला.
पोलिसांना पाहून वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकी कांबळे याला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता ६६ पॅकेट्स आणि एका पिशवीत मिळून तब्बल १३४ किलो गांजा आढळला.
या गांजाची किंमत सुमारे ३३ लाख ५० हजार रुपये असून वाहन, मोबाईल आणि इतर साहित्यांसह ४२ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सांगलीतील या कारवाईत गांजा ओडिशातून आणल्याचे तसेच त्याच्या पुढील वितरणाचे धागे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मग बारामतीत आणखी २३ किलो गांजा पकडला. तो याच तपासादरम्यान..! २१ मे रोजी बारामतीतील गवारे चौकात पोलिसांनी आणखी एका इनोव्हा क्रिस्टा वाहनातून २३ किलो १० ग्रॅम गांजा जप्त केला.
या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
गांजा, वाहन आणि मोबाईल असा एकूण २१ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या गुन्ह्याच्या तपासातही विकी कांबळे आणि संग्राम उर्फ चंदन सिंग यांच्याशी संबंधित धागे समोर आल्याने दोन्ही प्रकरणांचा तपास परस्परांशी जोडला गेला.
आकडा थरकाप उडवणारा! बारामती शहर पोलीस ठाण्यातील दोन NDPS गुन्ह्यांत मिळून ५०१ किलो ९६० ग्रॅम गांजा जप्त झाला आहे.
त्यात सांगली-कुपवाड येथील कारवाईतील १३४ किलो गांजा धरला तर संबंधित तपासातील जप्तीचा आकडा तब्बल ६३५ किलो ९६० ग्रॅमपर्यंत पोहोचतो.एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची उलाढाल होत असल्याचे चित्र समोर आल्याने बारामतीत गांजाच्या तस्करीचे जाळे नेमके किती खोलवर रुजले आहे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कांबळेच ‘बिग बॉस’ की मोठ्या रॅकेटमधील एक दुवा?
विकी कांबळेच्या अटकेनंतर या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. पोलिसांच्या तपासात त्याची भूमिका महत्त्वाची ठरत असली तरी तोच संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे का, याचा अंतिम निष्कर्ष अद्याप तपासातूनच समोर येणार आहे. ओडिशातून गांजा आणणारे कोण? महाराष्ट्रात तो कोण स्वीकारते? बारामतीत साठवणूक कुठे केली जाते? वाहतूक कोणत्या वाहनांतून होते? आर्थिक व्यवहार कोणाच्या माध्यमातून होतात? आणि हा माल पुढे कोणत्या नेटवर्कला पुरवला जातो? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिस शोधत आहेत.
सात दिवसांची पोलीस कोठडी; अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणार
२ सप्टेंबर रोजी रात्री कांबळे याला अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले असता त्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
या कालावधीत पोलिसांकडून गांजाचा मूळ स्रोत, ओडिशा-महाराष्ट्र पुरवठा साखळी, सहआरोपींची भूमिका, वाहतुकीसाठी वापरलेली वाहने, मोबाईल आणि डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार तसेच गांजा साठवणूक आणि वितरणाची ठिकाणे याबाबत चौकशी केली जाणार आहे.
दोन ड्रमपासून सुरू झालेला खेळ आता उघडणार?
जळोचीच्या शेतात पडून असलेले दोन ड्रम सुरुवातीला केवळ ‘गूढ ड्रम’ वाटत होते. मात्र त्यातून बाहेर पडलेला जवळपास अर्धा टन गांजा आणि त्यानंतर सांगली, ओडिशा व बारामतीपर्यंत पोहोचलेले धागे पाहता हे प्रकरण साधे स्थानिक गांजा विक्रीचे नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता पोलिसांसमोरचे खरे आव्हान केवळ ‘विकी कांबळे कोण?’ हे शोधण्याचे नाही; तर ‘या संपूर्ण रॅकेटच्या मागे नेमके कोण?’ हे शोधण्याचे आहे.
कांबळे हाच या नेटवर्कचा सूत्रधार आहे की त्याच्यामागे आणखी मोठे चेहरे आहेत, याचे उत्तर पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीकडे आणि तपासातून समोर येणाऱ्या नव्या नावांकडे बारामतीसह पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पुढील तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत.











