बारामती : महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे बेदरकार वाहनचालक, ट्रिपल सीट, विना परवाना वाहन चालविणारे तसेच वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्यांना आता बारामती पोलिसांनी चाप लावण्यास सुरुवात केली आहे. टी.सी. कॉलेजच्या प्रवेशद्वारावरच वाहतूक शाखेने अचानक नाकाबंदी करून वाहनचालकांची झाडाझडती घेतली. अवघ्या तीन तासांच्या कारवाईत ७८ वाहतूक नियमभंग प्रकरणे दाखल करून तब्बल ५९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
विशेष म्हणजे, अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहने चालवून घेतल्याप्रकरणी १३ स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. त्यामुळे आता प्रश्न केवळ विद्यार्थ्यांचा नसून, त्यांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांचाही आहे.
मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली १९ पोलीस अंमलदार आणि एक आर.सी.पी. पथक कारवाईत सहभागी झाले होते. बारामती शहर पोलिसांच्या मदतीने सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत कॉलेजच्या गेटसमोर अचानक नाकाबंदी करण्यात आली.
नियम तोडणाऱ्यांची ‘यादी’च तयार
नाकाबंदीत नंबर प्लेटपासून वाहन परवान्यापर्यंत अनेक नियमांचा भंग उघडकीस आला. लायसन्स जवळ न बाळगणे ३६, नंबर प्लेट ब्रोकन २१, लायसन्स नसणे २, ट्रिपल सीट १, नो पार्किंग ३, तर वाहन चालविताना मोबाईल वापरणे, काळी काच, विना HSRP नंबर प्लेट, वाहनात अनधिकृत बदल आदी प्रकरणांवरही कारवाई करण्यात आली.याशिवाय नो एन्ट्री, सीटबेल्ट, हेल्मेट, विमा, रेड रिफ्लेक्टर, अवैध प्रवासी वाहतूक आणि मोटार वाहन कायद्यातील कलम १८५ अंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या बाबींचीही तपासणी करण्यात आली.
कॉलेज परिसर की रेसिंग ट्रॅक?
महाविद्यालय सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत काही वाहनचालकांकडून विनाकारण परिसरात घिरट्या घालणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, मोठ्या आवाजात वाहने चालविणे, बेदरकारपणे वाहन हाकणे आणि प्रवेशद्वारासमोर वाहतूक कोंडी निर्माण करणे असे प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक पोलिसिंगवर भर दिला आहे. विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळणे ही केवळ महाविद्यालयाची जबाबदारी नसून, संपूर्ण शहराच्या कायदा-सुव्यवस्थेशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे अशा प्रकारांकडे दुर्लक्ष न करता पोलिसांकडून थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला जात आहे.
पालकांनो, मुलांच्या हातात वाहन देण्यापूर्वी विचार करा!
अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे म्हणजे केवळ वाहतूक नियमांचा भंग नव्हे, तर त्यांच्या आणि रस्त्यावरच्या इतर नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. एखादा अपघात घडल्यास त्याचे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांसह इतरांच्या कुटुंबांनाही भोगावे लागू शकतात. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांना दुचाकी अथवा इतर वाहने देऊ नयेत. विद्यार्थ्यांनी वैध परवाना असल्याशिवाय वाहन चालवू नये, हेल्मेट वापरावे, ट्रिपल सीट टाळावी आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये.
‘अचानक’ कारवाईचा पोलिसांचा इशारा..
वाहतूक पोलिस ठरावीक ठिकाणी आणि ठरावीक वेळेतच दिसतील, असा समज करून नियम तोडणाऱ्यांनी सावध व्हावे. महाविद्यालये, शाळा, प्रमुख चौक, गर्दीची आणि संवेदनशील ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक नाकाबंदी केली जाणार आहे. नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार सक्त कारवाई केली जाईल. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला विशेष प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.











