राजेंद्र झेंडे महान्युज लाईव्ह
दौंड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाने दौंड तालुक्यात पक्ष बळकटीसाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. पक्षात नव्या, युवा आणि महिला कार्यकर्त्यांना संधी देत दौंड शहरासह ग्रामीण भागात संघटन वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अंतर्गत पाटस येथील युवा कार्यकर्ते प्रशांत बबन ठोंबरे यांची दौंड तालुका युवक उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तसेच दौंड शहरासह ग्रामीण भागातील अनेक नवीन चेहऱ्यांना पक्षातील विविध पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, अशी माहिती तालुकाध्यक्ष रामभाऊ टुले यांनी दिली.
खासदार सुप्रिया सुळे यांचे दौंडकडे विशेष लक्ष..
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत तसेच भाजपमध्ये प्रवेश केला होता.
एकेकाळी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे विश्वासू मानले जाणारे तालुकाध्यक्ष ज्येष्ठ नेते अप्पासाहेब पवार यांनी देखील जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली होती.
मात्र पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः लक्ष घातले आहे. मागील आठवड्यात त्या दौंड दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षात नवीन चेहऱ्यांना काम करण्याची संधी देण्याचे संकेत दिले होते.
त्याचाच एक भाग म्हणून प्रशांत ठोंबरे यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला युवक उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर दौंड तालुक्यात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा राजकीय बळकटी येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.










