मुंबईच्या दिशेने निघालेला ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा पुण्याच्या शिवेवरच स्थगित! सरकारच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा!
राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
दौंड : पाटस टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेने निघालेला ओबीसी आरक्षण बचाव महामोर्चा पुण्याच्या वेशीवर पोहोचण्याआधीच तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. सरकारने चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली.
ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी ( दि १) दौंड तालुक्यातील पाटस टोलनाका येथुन मुंबई च्या दिशेने मार्गस्थ झाला होता. दरम्यान, मंगळवारी पाटस टोल नाका परिसरात या मोर्चा भोवती प्रचंड घडामोडी घडल्या. सकाळपासून मोर्चा रोखणे, तीन तास महामार्गावर ठिय्या आंदोलन आणि त्यानंतर स्वतः ग्रामिण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गील यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी तीन ते चार वेळा चर्चा केली.
मात्र कोणत्याही परिस्थितीत हा मुंबई मोर्चा मुंबईला पोहोचणारच अशी भूमिका हाके आणि आंदोलकांनी घेतली होती. मात्र बुधवारी हा मोर्चा यवतमधुन कासुर्डी गावच्या हद्दीत गेल्यानंतर प्रशासनाशी झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी हा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर झाला. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी थेट संपर्क साधला.
ओबीसीच्या सर्व प्रश्नांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी उपसमिती आणि मराठा उपसमिती यांची संयुक्त बैठक मंत्रालयात आयोजित करू, ओबीसीच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून उपाययोजना करू, असे ठोस आश्वासन बावनकुळे यांनी दिले. हे आश्वासन मिळाल्यानंतर मुंबईकडे निघालेला मोर्चा तात्पुरता दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे स्थगित करण्याचा निर्णय ओबीसी बचाव कृती समितीने घेतला आहे.
ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवावी, बोगस आणि बनावट ओबीसी जातीचे दाखले तात्काळ रद्द करावेत आणि ओबीसी, भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हा महामोर्चा पाटस येथून आझाद मैदान, मुंबईकडे निघाला होता. सरकारच्या या सकारात्मक प्रतिसादानंतर आता मंत्रालयातील संयुक्त बैठकीकडे संपूर्ण ओबीसी समाजाचे लक्ष लागले आहे.










