बारामती : तालुक्यातील कन्हेरी परिसरात एप्रिल महिन्यात मोटारसायकलवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून चोरून नेल्याच्या प्रकरणाचा बारामती तालुका पोलिसांनी छडा लावला. या गुन्ह्यातील २२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले आणि आज ते फिर्यादीला सुपूर्द करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराधा संतोष पागळे (वय ३४, व्यवसाय गृहिणी, रा. जळोची, बारामती) या ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.५५ वाजण्याच्या सुमारास कन्हेरी येथून जळोचीच्या दिशेने मोटारसायकलवरून जात होत्या. कन्हेरी गावाच्या हद्दीतील लाकडी जळोची रोडवर बटरफ्लाय गार्डनच्या पुढे त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करून थांबविले.
यावेळी मागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाचे दोन पदरी फॅन्सी मंगळसूत्र, अंदाजे १ लाख ७० हजार रुपये किमतीचे, जबरदस्तीने ओढून चोरून नेले. या घटनेप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०४(३)(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष बडे यांनी केला.
तपासादरम्यान पोलिसांनी गणेश मंगेश काळे (वय २२, रा. कुळधरण, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याला अटक केली. त्याच्याकडून फिर्यादीच्या गळ्यातून लांबविलेले १३ ग्रॅम वजनाचे दोन पदरी फॅन्सी मंगळसूत्र, किंमत अंदाजे १ लाख ७० हजार रुपये, हस्तगत करण्यात आले. हस्तगत करण्यात आलेले सोन्याचे मंगळसूत्र ३१ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १०६(३) अन्वये फिर्यादीस परत करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष बडे आणि मुद्देमाल कारकून भारत खंडागळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.










