राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील अनेक गावात बिबट्यांची दहशत असतानाच आता कोल्या या वन्य प्राण्यांचा वावर सुरू झाला आहे. तालुक्यातील भीमा नदीच्या काठालगत असलेल्या मुळ गार परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका धोकादायक कोल्ह्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कोल्ह्याने गावातील अनेक नागरिकांच्या पाळीव कोंबड्या ठार करून फस्त केल्या आहेत.
शनिवारी (दि २९) रात्री या कोल्ह्याने शेतकरी अनिल चव्हाण यांच्या तब्बल १५ कोंबड्या मारून खाल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे रात्री शिकार करूनही हा कोल्हा सकाळी पुन्हा त्याच ठिकाणी येऊन आणखी शिकार आहे का? हे पाहत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या संदर्भात वनविभागाचे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे आणि वन कर्मचारी वाघमारे यांना लेखी तसेच दूरध्वनीद्वारे वारंवार तक्रारी करून माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केलेली नाही.
ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, वनविभागाने तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा करावा आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. तसेच तातडीने पिंजरा लावून या कोल्ह्याचा बंदोबस्त करावा. भविष्यात या कोल्ह्याच्या हल्ल्यामुळे एखाद्या नागरिकाला दुखापत किंवा जीवितहानी झाल्यास, यापूर्वी वारंवार माहिती देऊनही प्रतिबंधात्मक कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.











