फलटणच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरच्या मृत्यूने खळबळ; डॉ. सुषमा अंधारेंचा गंभीर सवाल
‘डॉक्टर मानसिक दडपणाखाली का येतात?’; घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी
फलटण : फलटण येथील शासकीय रुग्णालयातील तरुण डॉक्टर डॉ. राजेंद्र रुपनवार यांच्या मृत्यूच्या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह फलटणमध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या डॉ. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. फलटणच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर मानसिक दडपण येत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
डॉ. अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये डॉ. राजेंद्र रुपनवार हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत मुंबईच्या जे. जे. मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाले आणि त्यानंतर फलटणच्या शासकीय रुग्णालयात सेवेत रुजू झाल्याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दीड महिन्यापूर्वी डॉ. रुपनवार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या वेळी डॉक्टरांनी हातावर सुसाईड नोट लिहिली होती. डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला होता, असा दावा डॉ. अंधारे यांनी केला आहे.
मात्र, नोकरीवर परिणाम होण्याची तसेच वरिष्ठांकडून त्रास होण्याची भीती असल्याने डॉ. रुपनवार बोलण्यास तयार नव्हते, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी डॉ. रुपनवार यांनी मुंबईतील सायन परिसरातील एका टॉवरवरून उडी घेतल्याचे डॉ. अंधारे यांनी नमूद केले आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
या घटनेतील आणखी एका बाबीकडे डॉ. अंधारे यांनी लक्ष वेधले आहे. दीड महिन्यापूर्वीच्या कथित आत्महत्येच्या प्रयत्नावेळी डॉक्टरांनी आपल्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, यासंदर्भात नावे लिहिल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, मृत्यूपूर्वीच्या कथित जबाबात ‘माझी कुणाबद्दलही तक्रार नाही’ तसेच मृत्यूनंतर देह वैद्यकीय महाविद्यालयाला प्रशिक्षणासाठी दान करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे डॉ. अंधारे यांनी म्हटले आहे.
हा जबाब स्वेच्छेने देण्यात आला की, त्यामागे कोणतेही दबावाचे कारण होते, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. तथापि, या संदर्भातील दावे अधिकृत तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे. ‘फलटणच्या शासकीय रुग्णालयात नेमके काय घडत आहे? तेथील डॉक्टर वारंवार मानसिक तणाव किंवा दडपणाखाली का येत आहेत?’ असा थेट सवाल डॉ. अंधारे यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी फलटणमध्ये डॉ. संपदा मुंडे यांच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयातील कामाचे वातावरण, डॉक्टरांवरील कथित दबाव आणि प्रशासकीय पातळीवरील परिस्थिती यांची चौकशी करण्याची गरज व्यक्त केली आहे.
दरम्यान, डॉ. राजेंद्र रुपनवार यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, त्यांच्या कथित आत्महत्येच्या प्रयत्नांची पार्श्वभूमी काय होती आणि त्यांनी यापूर्वी कोणाकडे काही तक्रार अथवा माहिती दिली होती का, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिस तपास आणि संबंधित वैद्यकीय व प्रशासकीय यंत्रणांच्या चौकशीतून या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे. डॉक्टरांसारख्या जबाबदार व्यावसायिकांनाही मानसिक ताणाला सामोरे जावे लागत असल्यास त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे या घटनेच्या निमित्ताने अधोरेखित होत आहे.











