शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील किराणा दुकानासाठी आणलेले तेलाचे डबे चोरणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर शहरातील एका किराणा दुकानासाठी आणलेले तेलाचे डबे चोरीची गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता.
सदर घटनेचा समांतर तपास करत असताना हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित भोसले (रा. पाण्याची टाकी, शिरूर) याने त्याच्या साथीदारासोबत केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भोसलेसह देविदास काळे, कय्यूम भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी १७ सूर्यफूल तेलाचे डबे, २४ सोयाबीन तेलाचे डबे असे एकूण ४१ तेलाचे डबे पोलिसांनी जप्त केले आहे.
हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक फौजदार संजय पड्याळ, सहायक फौजदार तुषार पंदारे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ यांच्या पथकाने केला आहे.











