मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मालकी आणि संस्थापकत्वावरून अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आणि शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख आमनेसामने आले आहेत. ‘संस्थापकत्व हा इतिहास आहे, मालकी हक्क नाही’ अशी भूमिका मांडत उमेश पाटील यांनी शरद पवारांना लक्ष्य केल्यानंतर मेहबूब शेख यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘संस्थापकाने उभा केलेला पक्षच त्यांच्याकडून हिरावून घेण्याचा नैतिक अधिकार कुणाला?’, असा थेट सवाल शेख यांनी केला आहे.
उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमधून काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्ष, डीएमके, एआयएडीएमके आणि टीडीपी या पक्षांची उदाहरणे देत राजकीय पक्ष कोणाच्याही तहयात मालकीचा नसतो, असे म्हटले होते. ‘Founder is history, Leadership is organisation, Legal recognition is law’ अशी मांडणी करत त्यांनी पक्षाच्या संस्थापकत्वापेक्षा संघटनात्मक नेतृत्व आणि कायदेशीर मान्यतेला महत्त्व असल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र, याच मुद्द्यावर मेहबूब शेख यांनी उमेश पाटील यांना लक्ष्य करत ‘इतिहासाचा सोयीचा भाग सांगून चालणार नाही’, असा टोला लगावला आहे. पवारांनी पक्ष स्वतःच्या कष्टाने उभा केला असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी २५ वर्षांपूर्वी स्वतःच्या कष्टातून उभा केला, हा इतिहास कुणाच्याही राजकीय सोयीसाठी बदलता येणार नाही, असे शेख यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी कधीही राष्ट्रवादीला आपली खासगी मालमत्ता म्हटले नाही; मग पक्षाची स्थापना करणाऱ्या व्यक्तीलाच पक्षातून बेदखल करण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे?, असा सवाल त्यांनी केला.
‘काँग्रेस-भाजपची उदाहरणे देणे सोपे; पण…’
उमेश पाटील यांनी दिलेल्या विविध राजकीय पक्षांच्या उदाहरणांवरही शेख यांनी आक्षेप घेतला. काँग्रेस, भाजप किंवा डीएमकेची उदाहरणे देणे सोपे आहे; मात्र त्या पक्षांमध्ये संस्थापकांनी उभ्या केलेल्या पक्षातून त्यांनाच हुसकावून लावून, सत्तेच्या जोरावर पक्ष बळकावण्याचा प्रकार घडला का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘दिल्लीतील निर्णय काय सांगतो?’
राष्ट्रवादीतील फुटीचा संदर्भ देताना शेख यांनी दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्णयाचाही उल्लेख केला. राष्ट्रीय कार्यकारिणीने शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष राहतील, असा निर्णय घेतला होता. त्यानंतर सत्तेच्या लालसेपोटी बंड करून पक्षाचे संविधान आणि संघटनात्मक निर्णय धाब्यावर बसवत पक्ष बळकावला गेला, असा आरोप शेख यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. ‘पक्ष कार्यकर्त्यांचा असेल, पण विचार कुणाचे?’ राजकीय पक्ष हा जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा असतो, हे मान्य; मात्र ज्यांनी पक्ष उभा केला, त्यांच्या विचारांवर राजकारण करायचे आणि त्यांनाच पक्षातून बेदखल करायचे, ही कोणती नैतिकता?, असा सवाल करत शेख यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.
नाव बदलता येईल, चिन्ह बदलता येईल, पदे बदलता येतील; मात्र २५ वर्षांचा इतिहास आणि शरद पवारांचे योगदान पुसता येणार नाही, असेही शेख यांनी ठणकावले.
‘राष्ट्रवादी कोणाची?’ प्रश्नाला उत्तर शरद पवारांचीच!
मेहबूब शेख यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाचा संदर्भ देत अजित पवार गटाला चिमटा काढला. ‘महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात, प्रत्येक बांधावर जाऊन विचारा—राष्ट्रवादी कोणाची? तर प्रत्येकजण सांगतो, शरद पवारांची,’ असा दावा करत त्यांनी उमेश पाटील यांच्या भूमिकेवर पलटवार केला.
एकंदरीत यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील ‘संस्थापकत्व विरुद्ध कायदेशीर मान्यता’ हा संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एका बाजूला पक्षाला कायदेशीर मान्यता, निवडणूक चिन्ह आणि संघटनात्मक नेतृत्वाचा आधार देत अजित पवार गटाकडून भूमिका मांडली जात असताना, दुसऱ्या बाजूला पक्षाची स्थापना, विचारधारा, कार्यकर्त्यांचा भावनिक संबंध आणि शरद पवारांचा २५ वर्षांचा राजकीय वारसा पुढे करत शरदचंद्र पवार गट प्रत्युत्तर देत आहे. आता उमेश पाटील यांच्या पोस्टला मेहबूब शेख यांनी दिलेल्या या सणसणीत उत्तरानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील राजकीय शब्दयुद्ध आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.











