रामभाऊ जगताप
सांगवी, दि. ३१ : अजितदादांच्या सातव्या मासिक श्राद्धानिमित्त सांगवी येथे शेतकरी बांधवांसाठी प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शेतकरी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीचे योग्य नियोजन कसे करावे, याबाबत शेतकऱ्यांना या कार्यक्रमातून मार्गदर्शन मिळणार आहे.
मंगळवार, दि. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सांगवी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर हा कार्यक्रम होणार आहे. आगामी काळातील हवामानाचा अंदाज, पावसाची स्थिती, बदलत्या हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम तसेच विविध पिकांचे नियोजन याबाबत पंजाबराव डख मार्गदर्शन करणार आहेत.
हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांसमोर पीक निवड, पेरणी, पिकांची वाढ, पाणी व्यवस्थापन आणि संभाव्य हवामान बदलानुसार शेतीचे नियोजन अशी अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर डख यांच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना आगामी काळातील शेतीचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना आपल्या शेतीविषयक तसेच हवामानाशी संबंधित प्रश्न थेट विचारण्याची संधीही मिळणार आहे. परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांगवी ग्रामपंचायतीचे सदस्य प्रणव तावरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.











