सोलापूर : कृष्णा नदीचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी प्रस्तावित असलेल्या १९ हजार कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी ‘कृष्णा फ्लड डायव्हर्शन’ योजनेला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. या प्रकल्पाच्या सविस्तर सर्वेक्षणासाठी जलसंपदा विभागाच्या अन्वेषण विभागाने चार प्रमुख कामांसाठी सुमारे १६ कोटी ८१ लाख रुपयांची ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळांतर्गत ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती अंतिम होणार आहे. या प्रकल्पामुळे कृष्णा नदीचे सुमारे ६० टीएमसी पाणी उजनी धरणात वळवले जाणार असून, त्यातील तब्बल ४० टीएमसी पाण्याचा थेट लाभ सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याला मिळणार आहे.
विविध टप्प्यांसाठी निविदांचा तपशील
प्रकल्पाचे सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन, अंदाजपत्रक व सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी कामांची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे:
सांगली जिल्हा (२९ किमी): २ कोटी ५८ लाख ६३ हजार रुपये. सातारा जिल्हा (२९ किमी): ३ कोटी १५ लाख ८९ हजार रुपये. सातारा जिल्हा – तिसरा टप्पा (२६ किमी): ४ कोटी ५३ लाख २ हजार रुपये. चौथा टप्पा: सांगली, पुणे, सोलापूर, सातारा, धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी ५ कोटी ६३ लाख ३३ हजार रुपये
दुष्काळी भागाला संजीवनी
या योजनेसाठी ‘एशियन बँक’ (ADB) निधी देण्यास तयार असल्याने अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला हा प्रकल्प आता कागदावरून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने पुढे सरकेल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सप्टेंबरमध्ये सर्वेक्षण निविदा निश्चित झाल्यानंतर डीपीआरच्या कामाला वेग येईल, ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळी तालुक्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.











