संदीप मापारी पाटील बुलढाणा
लोणार : हॉटेलमध्ये चहासाठी काही मिनिटे थांबणे कांदा बी व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. व्यापाऱ्याने लॉक करून ठेवलेल्या स्कार्पिओच्या चालकाच्या मागील बाजूची काच दगडाने फोडून अज्ञात चोरट्यांनी गाडीतील सुमारे साडेतीन लाख रुपये रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली. चोरीनंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. ही घटना २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी अकराच्या सुमारास लोणार शहरातील लोणी नाक्याजवळील हॉटेल परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना येथील रहिवासी तसेच सध्या केशव शिवणी येथे वास्तव्यास असलेले दिलीप माधवराव खरले हे कांदा बीचे व्यापारी आहेत. ते कांदा बी खरेदी करण्यासाठी पांगरा डोळे येथे आले होते. त्यानंतर ते शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी नाक्याजवळील एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबले.
खरले यांनी आपली स्कार्पिओ क्रमांक एमएच २८ सीसी ५७५४ हॉटेलच्या परिसरात लॉक करून ठेवली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वाहनाच्या चालकाच्या सीटमागील खिडकीची काच दगडाने फोडली. गाडीमध्ये ठेवलेली रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरट्याने बाहेर काढली. त्यानंतर साथीदारासह दुचाकीवरून घटनास्थळावरून धूम ठोकली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी तातडीने पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घोगरे, लेखनिक गणेश लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंदे, गजानन डोईफोडे आणि चालक हरिभाऊ ढाकणे यांनी घटनास्थळी पाहणी केली.
पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच चोरट्यांच्या हालचालींचा माग काढण्यासाठी परिसरात नाकाबंदी करण्यात आली. मात्र, तोपर्यंत आरोपी दुचाकीवरून लोणी रोडच्या दिशेने पसार झाले होते.
या धाडसी चोरीमुळे लोणार शहरात खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी दिलीप खरले यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३२४(२) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनाली गर्जे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.










