सचिन पवार सुपे (बारामती)
शेतकऱ्यांकडून ऊस तोडून नेऊन त्यापासून गूळ उत्पादन केले; मात्र त्याची देय रक्कम अदा न करता न वटणारे धनादेश देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या गूळ उत्पादकाला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. दौंड तालुक्यातील दापोडी येथील आणेव फळ उत्पादक संस्थेचा गूळ उत्पादक सोमनाथ विश्वनाथ रूपनवर याला बारामती येथील फौजदारी न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला.
या प्रकरणाची सुनावणी बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. काळे यांच्या न्यायालयासमोर झाली. न्यायालयाने आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा सुनावत दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे.
या प्रकरणातील फिर्यादी रविंद्र ज्ञानदेव चांदगुडे, रा. दंडवाडी (सुपे) यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. शेतकऱ्यांकडून ऊस तोडून नेल्यानंतर त्याची देय रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली होती. मात्र, संबंधित धनादेश बँकेत सादर केल्यानंतर ते वटले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या उसाची रक्कम मिळाली नाही आणि आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला.
ऊस उत्पादनासाठी वर्षभर कष्ट घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची रक्कम वेळेवर मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत धनादेश देऊन तो न वटल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीविरुद्ध शिक्षा सुनावली.
फिर्यादीच्या वतीने सुपे येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. चंद्रशेखर रमेशराव जगताप यांनी काम पाहिले. न्यायालयाच्या या निकालामुळे शेतकऱ्यांच्या मालाची रक्कम थकवून किंवा न वटणारे धनादेश देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशांशी खेळ करणाऱ्यांविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देता येतो, हे या निकालातून अधोरेखित झाले आहे.











