बारामती : दौंड तालुक्यातील खोरवडी येथे घरातून बोलावून नेल्यानंतर डोक्यात दगड घालून एका व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी आरोपी बाप-लेकांना बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गोरख आबा काळे आणि अक्षय गोरख काळे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
२५ ऑगस्ट २०२२ रोजी खोरवडी येथे खळबळजनक घटना घडली होती. फिर्यादी यांचा मुलगा जपान्या किसन चव्हाण यांना आरोपींनी खोरवडी येथून ‘सासरवाडी येथे जाऊन राहा’, असे सांगून बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी क्रमांक १ व २ यांनी जपान्या चव्हाण यांना उचलून आपटले तसेच त्यांच्या डोक्यात दगड मारून त्यांचा खून केल्याचे न्यायालयीन प्रकरणात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेपूर्वीही आरोपींकडून जपान्या चव्हाण यांना खोरवडी गावात तू कुठेही यायचे नाही, अशा स्वरूपाच्या धमक्या व मारहाण केली जात असल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणी मृताच्या आईने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या खटल्याची सुनावणी बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाने एकूण १४ साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी बालसाक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकाऱ्यांची साक्ष न्यायालयासमोर सादर केली. उपलब्ध पुरावे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोन्ही आरोपी दोषी ठरवले.
१९ ऑगस्ट २०२६ रोजी बारामती जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी दोन्ही आरोपींना भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली असून दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील ॲड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी खटल्यातील पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरल्याने बाप-लेकांना खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली.
या खटल्याच्या कामकाजात सरकारी वकील ॲड. ज्ञानदेव शिंगाडे यांना ॲड. योगेश काळभोर, कोर्ट पैरवी अधिकारी सहायक फौजदार अभिमन्यू कवडे, कोर्ट अंमलदार महिला पोलीस हवालदार मनिषा अहिवळे तसेच सरकारी अभियोक्ता कार्यालयाचे लिपिक एस. एस. कांबळे यांनी सहकार्य केले.










