बारामती : खूनप्रकरणात तब्बल ७२५ दिवसांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला बारामती शहर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. माळावरची देवी परिसरातील जवाहर पार्क येथे पोलिसांनी सापळा रचून अनिकेत संजय पवार (वय २०, रा. जगतापमळा, खंडोबानगर, बारामती) याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.
बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४६/२०२४ मधील अनिकेत पवार हा पाहिजे आरोपी होता. २२ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत तो पोलिसांना गुंगारा देत होता. जुन्या वादातून १७ वर्षीय गणेशचा खून झाला होता, त्या प्रकरणात आरोपी असलेला अनिकेत पोलिसांना गुंगारा देत होता.
या प्रकरणाची सुरुवात २०२३ मध्ये टी.सी. कॉलेज परिसरात झालेल्या वादातून झाली होती. गणेश धुळाबापू वाघमोडे (वय १७, रा. जळोची) याचे जयेश बाबासाहेब माने आणि त्याच्या साथीदारांशी भांडण झाले होते. याच पूर्ववैमनस्यातून २१ ऑगस्ट २०२४ रोजी गणेशवर हल्ला झाला. गणेश मित्रांसोबत कपडे खरेदी करून जळोचीच्या दिशेने परतत असताना त्याचा पाठलाग करण्यात आला. काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ चारचाकी वाहनातून आलेल्या व्यक्तींनी त्याचा रस्ता अडवून धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर गणेशचा शोध घेतला असता तो ओढ्यालगतच्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळला. त्याच्या डोक्यासह मान व शरीराच्या अन्य भागांवर धारदार शस्त्राने वार झाल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणाच्या तपासात जयेश माने, शुभम गायकवाड, करण जाधव, आतिश गुरळकर, सोमनाथ यादव, भोल्या उर्फ किशोर भिसे, बंडू काळे उर्फ बी.के. यांच्यासह अनिकेत पवारची भूमिकाही तपासण्यात आली व तोही यातील गुन्हेगार ठरला. दरम्यान या प्रकरणाचा तपास करताना काही आरोपींना अटक करण्यात आली होती. गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले. मात्र अनिकेत पवार पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
गुन्ह्यानंतर काही आरोपींच्या संपर्कात राहून त्यांना चारचाकी वाहनातून बाहेरगावी नेऊन सोडल्याचा त्याच्याशी संबंधित तपासाचा भाग समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. दरम्यान अनिकेतचा शोध सुरू असतानाच पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना गोपनीय बातमीदारामार्फत तो माळावरची देवीजवळील जवाहर पार्क परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जवाहर पार्क परिसरात दबा धरला. अनिकेत तेथे येताच पोलिसांची चाहूल लागल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला पकडले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून १७ ऑगस्ट रोजी रात्री ११.५५ वाजता त्याला अटक करण्यात आली.
न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
जामिनावर बाहेर अन् कोर्टाच्या तारखांना गैरहजर; दुसऱ्यालाही अटक
याच खूनप्रकरणातील भोल्या उर्फ किशोर बापू भिसे हा जामिनावर असताना न्यायालयीन तारखांना हजर राहत नसल्याने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. पोलीस हवालदार टापरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर त्याचाही शोध घेण्यात आला. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला ताब्यात घेऊन न्यायालयीन वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली. न्यायालयाने त्याचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
जुन्या गुन्ह्यांतील फरार आरोपींवर पोलिसांची नजर
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या निर्देशानुसार जुन्या गुन्ह्यांतील फरार, पाहिजे तसेच न्यायालयीन प्रक्रियेला गैरहजर राहणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी पोलीस ठाण्यातील जुन्या गुन्ह्यांचा आढावा घेत फरार आरोपींची माहिती अद्ययावत करण्यासह त्यांच्या जुन्या-सध्याच्या ठिकाणांचा शोध घेणे आणि गोपनीय बातमीदारांचे नेटवर्क सक्रिय ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अनिकेत पवारला पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार यशवंत पवार, ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, गिरीश नेवसे, सागर जामदार आणि विशाल शिंदे यांनी कारवाई केली. तर भोल्या उर्फ किशोर भिसे याला ताब्यात घेण्याची कारवाई पोलीस हवालदार टापरे व त्यांच्या पथकाने केली.










