शिरूर : महान्यूज लाईव्ह
पोलीस खात्यात उत्कृष्ट सेवेबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाचे “अति उत्कृष्ट सेवा पदक” आणि “उत्कृष्ट सेवा पदक” पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्यासह १३ अंमलदारांना जाहीर करण्यात आले आहे.
पोलीस खात्यात दीर्घकालीन व निष्कलंक सेवेची दखल घेऊन प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अति उत्कृष्ट सेवा पदक आणि उत्कृष्ट सेवा पदक हे केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे देण्यात येते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा करण्यात आली.
पुणे ग्रामीणचे गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भोकरे, सहाय्यक फौजदार रामदास बाबर, दिपक साबळे, महेश बनकर, हेड कॉन्स्टेबल जनार्दन शेळके, राहुल पवार, राजू मोमीन, गुरुनाथ गायकवाड, अमोल शेडगे,सहायक फौजदार दत्तात्रय तांबे, पोलीस हवालदार मंगेश थिगळे, अजित भुजबळ यांना जाहीर करण्यात आले.
पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत जनार्दन शेळके यांसह राजू मोमीन यांनी अनेक महत्त्वाचे गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहे. तसेच गुन्हे शाखेतील अंमलदारांची देखील उत्कृष्ट कामगिरी आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांची पोलिस खात्यातील सेवा देखील कौतुकास्पद ठरली आहे.
पोलिस हेड कॉन्स्टेबल जनार्दन शेळके व राजू मोमीन यांना या पूर्वी उल्लेखनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालक पदक प्राप्त झाले आहे. पदक जाहीर झाल्यानंतर पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व अधिकारी व अंमलदारांचे सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.










