नांदेड : महान्यूज लाईव्ह
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमधील गुरुद्वारा परिसरात कृपाणाने झालेल्या हल्ल्याने राज्यासह देशभरात खळबळ उडाली. मात्र या थरारक प्रसंगात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता क्षणार्धात हल्लेखोराच्या दिशेने धाव घेत त्याचा हल्ला परतवून लावणारे पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांचे धाडस सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
केंद्रे यांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर या हल्ल्याचे परिणाम आणखी गंभीर झाले असते अशी परिस्थिती घटनाक्रमावरून स्पष्ट होते. सुखबीरसिंह बादल हे नांदेडमधील माता साहिब देवाजी गुरुद्वारा परिसरात धार्मिक दर्शनासाठी आले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह पंजाबमधील सुरक्षा कर्मचारी आणि महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.
दर्शन आटोपून बादल बाहेर येत असताना निहंग वेशातील एका व्यक्तीने कृपाणाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोराने बादल यांच्या छातीच्या दिशेने वार करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. क्षणभरात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र सुरक्षा यंत्रणेतील पोलिसांनी तत्काळ हालचाल केली. या वेळी विशेष पोलीस पथकाशी संबंधित पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी हल्लेखोराला बाजूला करण्यासाठी धाव घेतली.
हल्लेखोराला रोखण्याच्या प्रयत्नात झालेल्या झटापटीत केंद्रे स्वतः जखमी झाले. त्यांच्या या हस्तक्षेपामुळे हल्लेखोराला पुढील वार करता आला नाही आणि मोठी दुर्घटना टळली. हल्ल्यात सुखबीर सिंह बादल यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे हल्लेखोराला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार तो ६२ वर्षीय जसपाल सिंह असून तो नांदेडमधील गुरुद्वारात सेवक म्हणून काही काळापासून राहत होता. हल्ल्यामागील नेमका हेतू अद्याप तपासात स्पष्ट झालेला नाही.
डोळ्यादेखत घडला थरार; बादल कुटुंबीयांकडून केंद्रेंच्या धाडसाला सलाम..
हल्ल्याच्या वेळी सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल घटनास्थळी उपस्थित होत्या. त्यामुळे पतीवर झालेला अचानक हल्ला आणि त्यानंतर पोलिसांनी केलेला हस्तक्षेप त्यांनी प्रत्यक्ष पाहिला. या प्रसंगानंतर बादल कुटुंबीयांनी संतोष केंद्रे यांच्या धाडसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पाच लाख रुपये बक्षीस जाहीर केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेतून पोलिसांच्या भूमिकेचा आणखी एक पैलू समोर आला आहे.
पोलिसांवर अनेकदा टीका केली जाते, त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जातात, मात्र संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे संरक्षण करणारे अधिकारीही याच पोलिस दलात आहेत. संतोष केंद्रे यांनी केलेली कृती ही केवळ एका व्हीआयपीच्या सुरक्षेपुरती मर्यादित नसून ‘कर्तव्य प्रथम’ या पोलिसी ब्रीदाची जिवंत उदाहरणे ठरली आहे.
सुखबीरसिंह बादल यांच्यावर होणारा संभाव्य जीवघेणा वार स्वतःच्या अंगावर घेण्याची वेळ आली, तरी केंद्रे मागे हटले नाहीत. क्षणाचाही विलंब न करता परिस्थितीचा अंदाज घेऊन हल्लेखोराला रोखणे आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेण्याच्या कारवाईत सहभागी होणे हे त्यांच्या धाडसाचे प्रतीक आहे.
पोलिसांना शिव्या देण्याआधी या धाडसालाही सलाम..
पोलिसांच्या चुका असतील तर त्यावर प्रश्न विचारलेच पाहिजेत, मात्र प्रत्येक वेळी पोलिसच चुकीचे असतात असेही नाही. नांदेडमधील ही घटना त्याचे ठळक उदाहरण आहे. काही सेकंदांचा निर्णय, क्षणभराची धाव आणि स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार न करता केलेला हस्तक्षेप यामुळे एका मोठ्या राजकीय नेत्याचा जीव वाचला आणि संभाव्य रक्तपात टळला. संतोष केंद्रे यांच्यासारखे अधिकारी हे गणवेशाची खरी शान आहेत. त्यांच्या धाडसामुळे पोलिस दलाकडे पाहण्याची सकारात्मक बाजू पुन्हा अधोरेखित झाली आहे.










