विक्री, साठवणूक आणि वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
बारामती : महान्यूज लाईव्ह
पंचमीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीला वेग आला असतानाच बारामती पोलिसांनी नायलॉन चायनीज मांजाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. जीवघेण्या चायनीज मांज्याची विक्री, साठवणूक किंवा वापर करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिला आहे.
पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन चायनीज मांजा अनेक निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या मांज्यामुळे दुचाकीस्वारांच्या गळ्याला गंभीर दुखापत होणे, पादचारी आणि लहान मुलांना इजा होणे, तसेच पक्ष्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे या धोकादायक मांज्याच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी बारामती पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी नागरिकांना आवाहन करत, नायलॉन चायनीज मांजा किंवा जीवाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या मांज्याचा वापर करू नये, तसेच अशा मांज्याची विक्री किंवा साठवणूक करणाऱ्यांची माहिती तात्काळ बारामती पोलिसांना द्यावी, असे म्हटले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत बारामती पोलीस सतर्क झाले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. पंचमीचा सण आनंदात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी नागरिकांनी जीवघेण्या चायनीज मांज्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











