अहिल्यानगर : महान्यूज लाईव्ह
कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, पीकविमा, कायदा-सुव्यवस्था आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांनी बुधवारी अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तासांची मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत रखडलेल्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामे तातडीने पूर्ण करण्याच्या तसेच निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
बैठकीत मतदारसंघातील रस्त्यांची संथ गतीने सुरू असलेली कामे, जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या निकृष्ट कामांच्या तक्रारी, कर्जत व जामखेड शहरातील अस्वच्छता, पाणीपुरवठा, वाढती गुन्हेगारी, वीजपुरवठ्यातील अडचणी आणि रद्द झालेल्या शासकीय इमारतींच्या कामांवर सविस्तर चर्चा झाली. तालुका स्तरावरील बैठकींमधून न सुटणारे प्रश्न जिल्हास्तरावर मार्गी लावण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी कोणतेही कारण न देता मतदारसंघातील २३९ पाणंद रस्ते रद्द झाल्याचा मुद्दा आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कर्जतमधील १,५२० आणि जामखेडमधील ९३० विहिरी केवळ कामे सुरू न झाल्यामुळे रद्द झाल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेअंतर्गत पाठविलेल्या १,१६८ प्रस्तावांपैकी केवळ ३५ किलोमीटरच्या रस्त्यांना मंजुरी मिळाल्याने उर्वरित प्रस्तावांनाही निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.
शेतजमिनींची मोजणी, इनाम व पोटखराबा जमिनींच्या नोंदी, पीकविमा, रेशनकार्डधारकांचे प्रश्न, तलाठी कार्यालयांसाठी जागा, कुकडी डावा कालवा प्रकल्पाचे भूसंपादन, खैरी प्रकल्पग्रस्तांचा मोबदला, रमाई आवास योजनेतील घरकुले, व्यापारी संकुल, सीसीटीव्ही व्यवस्था, जन्मदाखले, कचरा व्यवस्थापन आणि विविध नागरी प्रश्नांवरही सविस्तर चर्चा झाली. खेड-शिंपोरा रस्त्यावरील नांदणी नदीवरील पूल वाहून गेल्याने नवीन पूल उभारण्यासोबत तात्पुरता आर्मी बेली ब्रिज उभारण्याची मागणीही करण्यात आली.
जामखेड शहरातील महामार्गाचे संथ काम, श्रीगोंदा- जामखेड रस्त्यावरील भेगा आणि जलजीवन मिशनमधील निकृष्ट कामांबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील ७४ शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
खते आणि बियाण्यांची साठेबाजी व चढ्या दराने विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. वीजपुरवठ्याच्या समस्यांमध्ये जळालेले रोहित्रे वेळेत बदलणे, सिंगल फेज वीजपुरवठ्याची प्रलंबित कामे पूर्ण करणे, कृषी फिडरवरील वाड्या-वस्त्यांना नियमित वीज उपलब्ध करून देणे तसेच सौर योजनेतील अडचणी दूर करण्याबाबतही चर्चा झाली.
कायदा व सुव्यवस्थेच्या आढाव्यात मतदारसंघातील अवैध धंद्यांवर कारवाई, खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रकारांना आळा घालणे, भरोसा सेल अधिक प्रभावी करणे, विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवणे, बसस्थानकांवर सीसीटीव्ही बसविणे आणि पोलीस विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
बैठकीनंतर आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, तालुका स्तरावर सातत्याने बैठका घेऊन जनहिताचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र वरिष्ठ पातळीवरील विषय मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रस्ते, पाणीपुरवठा, पीकविमा, वीज, कायदा-सुव्यवस्था, विकासकामांचा दर्जा, खते-बियाण्यांचा काळाबाजार यासह सर्व महत्त्वाच्या विषयांवर अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, येत्या काही दिवसांत या प्रश्नांवर ठोस कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.











