मुंबई : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणीला नवी गती देत महिला आणि युवक या दोन्ही महत्त्वाच्या आघाड्यांवर नव्या नेतृत्वाची घोषणा केली आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातील अनुभवी आणि संघर्षशील नेत्या वैशाली नागवडे यांची तर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विदर्भातील युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या निखिल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी दोघांनाही नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यभर संघटन विस्ताराच्या दृष्टीने या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपद काही काळ रिक्त होते. त्यानंतर संघटनात्मक अनुभव, जनसंपर्क, पक्षनिष्ठा आणि महिलांमधील प्रभावी कामगिरी लक्षात घेऊन वैशाली नागवडे यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले.
वैशाली नागवडे या सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून कार्यरत असून, यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्याचबरोबर महिला काँग्रेसमध्ये पुणे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे. विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणाऱ्या तसेच संघटन उभारणीत सक्रिय योगदान देणाऱ्या नेत्या म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
दुसरीकडे, विदर्भातील युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या निखिल ठाकरे यांच्यावर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युवकांमध्ये संघटन विस्तार, नव्या कार्यकर्त्यांना संधी आणि राज्यभर पक्षाची युवा ताकद अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. महिला आणि युवक या दोन्ही संघटनांना सक्षम नेतृत्व देण्याचा पक्षाचा प्रयत्न या नियुक्त्यांतून स्पष्ट होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.










