संदीप मापारी पाटील, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील व्याघ्र संवर्धनाच्या दिशेने वन विभागाने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. काही महिन्यांपूर्वी या अभयारण्यात आणण्यात आलेल्या तरुण वाघाला आता जोडीदार मिळाला असून, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वर्षांची वाघीण ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अभयारण्यात नैसर्गिकरीत्या वाघांचे प्रजनन होण्याची आशा निर्माण झाली असून, वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यात यावर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ‘पिकेसिटी-१’ या नावाचा सुमारे ३५ महिन्यांचा तरुण वाघ आणण्यात आला होता. नव्या अधिवासाशी जुळवून घेत हा वाघ गेल्या सहा महिन्यांत पूर्णपणे स्थिरावला आहे. स्थानिक नागरिकांनी त्याच्या दमदार आणि प्रभावी वावरामुळे त्याचे प्रेमाने ‘धुरंदर’ असे नामकरण केले होते. मात्र, या वाघाचे दीर्घकालीन वास्तव्य आणि अभयारण्यात व्याघ्रसंख्या वाढवण्यासाठी त्याला योग्य जोडीदाराची आवश्यकता होती. त्यासाठी वन विभागाने गेल्या काही महिन्यांपासून विशेष प्रयत्न सुरू ठेवले होते.
या प्रयत्नांना अखेर यश आले असून, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली रेंजमधून दोन वर्षांची वाघीण ज्ञानगंगा अभयारण्यात आणण्यात आली आहे. बुलढाण्यात या नव्या पाहुणीचे स्वागत होत असून, स्थानिकांनी तिला ‘यालीना’ हे नाव दिले आहे. त्यामुळे आता ज्ञानगंगा अभयारण्यात ‘धुरंदर’ आणि ‘यालीना’ ही व्याघ्रजोडी वन्यजीवप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय ठरली आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वाघीण ताडोबाच्या मोहर्ली रेंजमधील प्रसिद्ध ‘कॉलरवाली’ वाघिणीच्या तीन बछड्यांपैकी एक आहे. तिची शारीरिक वाढ चांगली झाल्याने आणि स्वतंत्र अधिवासात राहण्यास सक्षम असल्याचे तज्ज्ञांनी निश्चित केल्यानंतर तिची ज्ञानगंगा अभयारण्यासाठी निवड करण्यात आली.
वन्यजीव तज्ज्ञांच्या विशेष पथकाने सोमवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अत्यंत काळजीपूर्वक या वाघिणीला पकडले. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर विशेष सुरक्षाव्यवस्थेतून तिला बुलढाणा जिल्ह्यातील २०५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात सुरक्षितपणे आणण्यात आले. संपूर्ण स्थलांतर प्रक्रियेदरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी, वनाधिकारी आणि तज्ज्ञांचे पथक सतत उपस्थित होते.
वन विभागाच्या मते, ज्ञानगंगा अभयारण्यात प्रजननक्षम वाघांची कायमस्वरूपी लोकसंख्या निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. धुरंदर आणि यालीना यांच्यामार्फत भविष्यात नैसर्गिकरीत्या वाघांचे प्रजनन झाल्यास ज्ञानगंगा अभयारण्याची जैवविविधता अधिक समृद्ध होईल. तसेच विदर्भातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, वाघ हा परिसंस्थेतील सर्वोच्च भक्षक असल्याने त्याची संख्या वाढणे म्हणजे संपूर्ण जंगलाचे पर्यावरणीय संतुलन अधिक सक्षम होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यात व्याघ्रसंवर्धनासाठी उचललेले हे पाऊल भविष्यात राज्यातील इतर अभयारण्यांसाठीही आदर्श ठरू शकते.
दरम्यान, धुरंदर आणि यालीना या नव्या व्याघ्रजोडीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य पुन्हा एकदा चर्चेत आले असून, वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांमध्येही या अभयारण्याविषयी उत्सुकता वाढली आहे. वन विभागाकडून दोन्ही वाघांच्या हालचालींवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यांच्या सुरक्षिततेसह प्रजननासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.











