डॉ. संदेश शहा, इंदापूर
इंदापूर तालुक्यातील मौजे वडापुरी येथील नंदीवाले समाजाचे आराध्य कुलदैवत असलेल्या अंबाजी लिंबाजी देवस्थानाच्या यात्रा-जत्रेला २० जुलैपासून प्रारंभ झाला असून ही यात्रा २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत चालणार आहे. तब्बल एक महिना सहा दिवस चालणारा हा धार्मिक सोहळा तीन वर्षांतून एकदा भरत असल्याची माहिती अंबाजी लिंबाजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ पवार यांनी दिली.
सुमारे ४०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि देशाच्या विविध भागांतून नंदीवाले समाजातील हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. यात्रा कालावधीत लाखो समाजबांधव एकत्र येत असून राहुट्यांची घरे उभारून मुक्काम करतात. या काळात विविध धार्मिक विधी, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच समाजाच्या परंपरेनुसार विविध वाद-विवादांचे न्यायनिवाडेही येथे केले जातात.
यात्रेसाठी संबंधित विभागाकडून एक महिना सहा दिवसांची अधिकृत परवानगी मिळाल्याचेही दशरथ पवार यांनी सांगितले. मात्र, एवढ्या मोठ्या यात्रेसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. देवस्थानासाठी मागणी केलेल्या जागेबाबत राज्य शासनाकडून अद्याप सकारात्मक निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यात्रा परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून भाविकांना पिण्याचे पाणीही सहज उपलब्ध होत नाही.
याशिवाय सार्वजनिक स्वच्छतागृहांची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने यात्रेकरूंना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी देवस्थान यात्रा समितीचे रामा वाघमोडे, लक्ष्मण वाघमोडे, अंबादास शेंडगे, रामभाऊ वाघमोडे, रामचंद्र वाघमोडे, राजाराम पवार, मारुती वाघमोडे, यल्लाप्पा वाघमोडे, अनिल वाघमारे, तायाप्पा पवार, मोतीराम पवार, सोपान पवार, मोतीराम वाघमोडे, रामा शिंदे, वसंत पवार, शांताराम पवार आणि प्रताप पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.











