इंदापूरातील कैद्यांप्रकरणी तुषार झेंडेपाटील यांच्या तक्रारीनंतर देशभरात तुरुंगांसाठी नवी नियमावली
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर येथे एका कैद्यास कोरोना झाल्यानंतरही विलगीकरण न करता एकाच बराकीत ठेवलेल्या १७ कैद्यांनाही कोरोना झाल्याने महान्यूजने वृत्त प्रसिध्द केले होते. त्यावरून राज्य ग्राहक संरक्षण परीषदेचे सदस्य अॅड. तुषार झेंडे पाटील यांनी थेट मानवाधिकार आयोगालाच तक्रार केली.
मानवाधिकार आयोगाने हे प्रकरण गांभिर्याने घेतले असून त्याची सुनावणी सुरू ठेवलीच आहे, त्यामुळे हे प्रकरण इंदापूरच्या प्रशासनावर शेकणारच आहे, मात्र त्यावरून मानवाधिकार आयोगाने थेट देशातील सर्व तुरुंगांमध्ये नवी नियमावली जारी केली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व तुरुंगांमध्ये मोफत साबण, सॅनिटायझर, मास्क व इतर सुरक्षेच्या सर्व बाबी पुरविण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात २९ ऑगस्ट २०२० रोजी तुषार झेंडे यांनी तक्रार केली होती. त्यावरून २१ सप्टेंबर रोजी मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्राच्या महासंचालक (तुरूंग) कार्यालयास यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यानुसार आठ आठवड्यांच्या आत इंदापूर मधील प्रकरणाची चौकशी करून त्यावरील कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
एवढ्यावर न थांबता मानवाधिकार आयोगाचे रजिस्ट्रार सुरजीत डे यांनी ५ ऑक्टोबर २०२० रोजी मानवाधिकार हक्क अधिनियम १९९३ नुसार केंद्रीय गृह मंत्रालयाला देशातील सर्व तुरुंगांमध्ये तातडीने वरील उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
अॅड. तुषार झेंडे पाटील, सदस्य ग्राहक संरक्षण परिषद महाराष्ट्र राज्य : इंदापूरच्या घटनेवरून मानवाधिकार आयोगाने दखल घेऊन यासंदर्भात निर्देश दिले आहेत, तथापि इंदापूरच्या घटनेसंदर्भात कारवाई होणार आहे हे निश्चित. यापुढील काळात अशा प्रकारची हयगय कोणी करू नये यासाठी ही कारवाईदेखील महत्वाची आहे.










