बारामती, दि. 19 : बारामती शहरातील संशयित दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक करण्यात आला असून, उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, वैज्ञानिक आणि कायदेशीर पद्धतीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी संदीप शिंदे यांनी 5 जुलै रोजी बारामतीतील एका व्यावसायिक आस्थापनाची तपासणी केली होती. या कारवाईत व्हे पावडर, स्किम्ड मिल्क पावडर (SMP) आणि व्हे परमिएट पावडर आढळून आल्याने त्यांचे नमुने घेण्यात आले. संबंधित साहित्य जप्त करून पंचनामा करण्यात आला तसेच परवाने आणि खरेदी-विक्रीच्या कागदपत्रांचीही पडताळणी करण्यात आली.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान जप्त नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्यांचे वैज्ञानिक विश्लेषण सुरू आहे. याशिवाय संबंधित पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, पुरवठा, विक्री, बँक व्यवहार, GST व FSSAI नोंदी, मोबाईल डेटा, CCTV फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे यांचीही सखोल तपासणी केली जात आहे.
या प्रकरणात प्रथमदर्शनी संबंधित आढळलेल्या व्यक्तींना तपासात सहकार्य करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या असून, आवश्यक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, तपासादरम्यान प्राप्त होणारे वैज्ञानिक अहवाल, दस्तऐवजी पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्याचवेळी निर्दोष व्यक्तींवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेतली जात आहे.
दरम्यान, राज्यभर अन्न व औषध प्रशासनाकडून दूधभेसळीविरोधात विशेष मोहीम सुरू असून विविध जिल्ह्यांत कृत्रिम दूध आणि भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर कारवाई करण्यात आली आहे. अन्नभेसळ हा नागरिकांच्या आरोग्याशी निगडित गंभीर गुन्हा असल्याने अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दूधभेसळ, कृत्रिम दूध निर्मिती, संशयास्पद साठवणूक किंवा वाहतुकीबाबत विश्वसनीय माहिती असल्यास ती तातडीने पोलिसांना किंवा अन्न सुरक्षा विभागाला द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.











