मावळ, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे सोमवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. पाटण गावात घरावर दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये नंदकुमार दत्तू टिकोणे, त्यांची पत्नी अनिता नंदकुमार टिकोणे आणि मुलगा ज्ञानेश्वर (माऊली) नंदकुमार टिकोणे यांचा समावेश आहे. पहाटे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग खचून टिकोणे कुटुंबाच्या घरावर कोसळला. त्यामुळे घर पूर्णपणे ढिगाऱ्याखाली दबले गेले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखालून तिघांचे मृतदेह बाहेर काढले.
नंदकुमार टिकोणे हे परिसरातील कष्टाळू आणि मनमिळावू शेतकरी म्हणून ओळखले जात होते. कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते शेती करत होते. मुलगा ज्ञानेश्वरचा विवाह अवघ्या वर्षभरापूर्वी झाला होता. संसाराची स्वप्ने डोळ्यांत असतानाच या दुर्घटनेने संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले.
या हृदयद्रावक घटनेनंतर पाटण गावासह संपूर्ण मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडप्रवण भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










