राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील बोरीभडक गावच्या परिसरात घरात घुसून 23 वर्षीय युवतीचे अपहरण करून 5 लाखांहून अधिक ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना गुरुवार ( दि. 2 ) सकाळी 10.30 वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, संशयित आरोपी कमरुद्दीन मुकीम शेख ,(रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे ) हा त्याच्या दोन अनोळखी साथीदारांसह दौंड तालुक्यातील बोरीभडक गावच्या नजीक असलेल्या फिर्यादीच्या राहत्या घरी आला. आरोपींनी फिर्यादीच्या 23 वर्षीय मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने ओढण्यास सुरुवात केली.
यावेळी आरोपीला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबीयांना आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवला. “गोळ्या घालून ठार मारतो” अशी धमकी देत त्या युवतीच्या वडिलांना ढकलून मारहाण केली. तसेच तिच्या आईलाही लाथ मारून शिवीगाळ केली.
पिस्तुलाचा धाक दाखवल्यानंतर आरोपींनी मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून पळवून नेले.
पळून जाताना आरोपींनी घरातील रोख रक्कम 5, 01,500 रुपये आणि 7 तोळे वजनाचा सोन्याचा गंठणही चोरून नेला. यासंदर्भात पिडित युवतीच्या वडीलांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी कमरुद्दीन शेख व त्याच्या 2 अनोळखी साथीदारांवर अपहरण, चोरी तसेच आर्म्स अॅक्ट कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान,
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे हे करीत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.











