नवी मुंबई : ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात कथित चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे सोनम डोंगरे या गर्भवती महिलेचा तिच्या गर्भातील बाळासह मृत्यू झाल्याच्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घणसोली येथे जाऊन त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले तसेच या कठीण प्रसंगी पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.
या घटनेला नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील गंभीर हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. या प्रकरणाविरोधात पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर काही संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
राज्यात आणि नवी मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप-शिवसेनेवर टीका करत, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात अपयश आल्यास सरकारने नागरिकांची माफी मागावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पीडित कुटुंबाला भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.










