राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
दौंड : पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस येथील बारामती फाट्यावर पंजाबी ढाब्याजवळ उभा असलेला मालवाहतूक टेम्पो भर पावसात अचानक पेटल्याची घटना घडली. दरम्यान, आग विझवण्यासाठी वेळेवर अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकली नाही. तसेच नागरीकांच्या प्रयत्नांना यश न आल्याने काही क्षणातच गाडी जळुन खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्गालगत आणि नवीन बारामती फाट्यावर असलेल्या पंजाबी ढाब्यावर उभा असलेल्या मालवाहतूक टेम्पोला शनिवारी ( दि ४) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. हा टेम्पो महामार्गाच्या कडेला उभा होता. अचानक त्याच्या इंजिन भागातून धूर निघू लागला आणि काही क्षणातच आगीचे लोळ दिसू लागले.
पावसाचे मोठे थेंब पडत असतानाही आग वेगाने भडकली. ही घटना पाहताच परिसरातील नागरिक आणि ढाब्यावरील कर्मचारी घटनास्थळी धावले. त्यांनी पाण्याच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. आगीमुळे टेम्पोतील माल व इंजिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेचे चित्र आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक वेळीच टेम्पोतून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, ही घटना महामार्गालगत घडल्याने काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . गाडीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पाटस पोलीस करीत आहेत.











