दौंड : महान्युज लाईव्ह
केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील कार्यरत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस या अंगणवाडी सेविकांना नुकतेच परिपत्रक काढून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कामकाज करण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र दौंड तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी या कामकाजाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
यासंदर्भात दौंड उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे आणि एकात्मिक महिला बालविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस या अंगणवाडी परिक्षेत्रातील शून्य ते सहा वर्षें वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांचे आहार व आरोग्य तसेच बालकांच्या पूर्व शालेय शिक्षणाचे कर्तव्य योजनेतील सेवांद्वारे पार पाडतात. सदर अंगणवाडी कर्मचारी राज्यातील बालकांच्या कुपोषण निर्मूलन या महत्त्वपूर्ण कामकाजासाठी आपल्या सेवा देत आहेत.
त्यामुळे अंगणवाडी सेविकांना आयसीडीएस योजनाबाह्य कामकाज दिल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील बालकांचे कुपोषण निर्मूलन व बालकांचे पूर्व शालेय शिक्षण या सेवा देण्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात अंगणवाडी सेविकांना मतदार केंद्रस्तरीय अधिकारी कामकाजाची सक्ती न करणे व आयसीडीएस योजनेची संबंधित नसलेले कोणतेही कामकाज करण्याचे आदेश न देण्याबाबतची मागणी केली आहे.
अंगणवाडी सेविकांना आयसीडीएस योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही योजना बाह्य कामकाज तसेच बीएलओ कामकाज याबाबत आदेश होऊ नयेत तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अंगणवाडी कर्मचारी यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची कोणतीही सक्ती करण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे या सूचना विचारात घेऊन अंगणवाडी सेविका यांना कोणतेही योजनाबाह्य कामकाज देण्यात येऊ नये. अशी मागणी दौंड तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी दौंड उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे यांची भेट घेऊन केली आहे. यासंदर्भात तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सविस्तर चर्चा करत आपले म्हणणे मांडले, आपल्या मागण्यांचा विचार करून जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन यावेळी लबडे यांनी अंगणवाडी सेविकांना दिले.











