महिलांनी सक्षम होणे काळाची गरज; इतिहासासह संस्कृती जपणाऱ्या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक
काका यादव, भवानीनगर
अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे यांच्या पुढाकाराने सलग १२ वर्षांपासून हा जयंती उत्सव आयोजित केला जातो. रविवारी कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर विविध मान्यवरांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.
प्रास्ताविकात कल्याणी वाघमोडे यांनी अहिल्यादेवींचे कार्य, विचार आणि सामाजिक बांधिलकी यांचा वारसा समाजात रुजविण्यासाठी असे उपक्रम आवश्यक असल्याचे सांगितले. छत्रपती शाहू महाराज जयंती व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन करत महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. उज्वला हाके यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत, “महिलांनी सक्षम होणे ही काळाची गरज आहे. अहिल्यादेवींनी आपल्या खाजगी संपत्तीचा उपयोग लोककल्याणासाठी करून आदर्श प्रशासन उभे केले. त्यांच्या कार्यातून प्रत्येक महिलेने प्रेरणा घ्यावी,” असे प्रतिपादन केले. तसेच गौतमाबाई होळकर यांच्या नावाने महिला पतसंस्था स्थापन करण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली.
माजी पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांनी कल्याणी वाघमोडे यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, “इतिहासासोबत गजी ढोल या लोकसंस्कृतीचे जतन करत महिलांच्या नेतृत्वाखाली इतका शिस्तबद्ध जयंती उत्सव मी प्रथमच पाहत आहे,” असे गौरवोद्गार काढले. समाजाप्रती प्रत्येकाचे काहीतरी देणे लागते, ही भावना जपण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ. पंकज भिवटे, ज्ञानेश्वर बुरुंगले, एमपीएससी मार्गदर्शक मनोज पिंगळे, डॉ. सुजित वाघमोडे आदींनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात झी इन्स्टिट्यूटचे संचालक राजेंद्र वाघमोडे, त्यांच्या मातोश्री तसेच व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे बी. एस. सय्यद यांना ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी व दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत जांब येथील जयश्री कवळे यांनी प्रथम, तर मेखळी येथील पूनम चोपडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. बाबीर तरुण गजे मंडळ (वाळकी) व तुळजाभवानी गजे मंडळ (निकमवाडी) यांनी सादर केलेल्या गजी ढोल नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढविली.
कार्यक्रमास रावसाहेब चोरमले, बापूराव सोलनकर, राहुल झारगड, वैभव सोलनकर, सुभाष ठोंबरे, अविनाश भिसे, ॲड. श्रीकांत करे, संदीप केसकर, अश्विनी पाटील, आशा रूपनवर, शुभम ठोंबरे, सागर देवकाते, चंद्रकांत वाघमोडे, दत्तात्रय पुणेकर, मीना थोरात, विजया पिंगळे, मंजुळा रूपनवर, शिवाजी लकडे, विशाल खामगळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास दोडताले यांनी केले, तर डॉ. सुजित वाघमोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.










