विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
सोमेश्वरनगर : युवा नेते जय पवार यांनी बारामती तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिपत्याखाली वाघळवाडीत उभारण्यात येत असलेल्या १०० खाटांच्या शासकीय रुग्णालयाच्या कामाचा आढावा, वाघळवाडी येथील दुमजली विरंगुळा केंद्राची पाहणी तसेच राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाला भेट दिली.
लोकनेते अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून साकार होत असलेल्या रुग्णालयाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम दर्जेदार, सुरक्षित आणि वेळेत पूर्ण व्हावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.हे रुग्णालय पूर्णत्वास आल्यानंतर बारामतीच्या पश्चिम भागातील हजारो नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उपचारासाठी मोठ्या शहरांवर असलेले अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.
त्यानंतर जय पवार यांनी वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या दुमजली विरंगुळा केंद्राच्या इमारतीची पाहणी केली. या केंद्रामध्ये नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधा, सार्वजनिक उपक्रमांसाठीची व्यवस्था तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या सोयींची माहिती त्यांनी जाणून घेतली.
याच दौऱ्यात जय पवार यांनी वाघळवाडी येथील अंगणवाडी केंद्राला सदिच्छा भेट देऊन राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाची पाहणी केली.अभियानाच्या अंमलबजावणीची माहिती त्यांनी आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविकांकडून जाणून घेतली. बारामती तालुक्यात आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकासाच्या विविध प्रकल्पांना गती देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या कामांचा सातत्याने आढावा घेत नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.










