डॉ. संदेश शहा, इंदापूर : इस्लामी नववर्षाच्या प्रारंभी येणारा मोहरम उत्सव इंदापूर शहरात धार्मिक श्रद्धा, पारंपरिक वैभव आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आबालवृद्धांचे आकर्षण ठरणारी पंजे व मानाच्या ताबुतांची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली.
मोहरमनिमित्त मुस्लिम बांधवांनी करबला येथील युद्धात अन्यायाविरुद्ध लढताना शहीद झालेल्या हजरत इमाम हुसेन व त्यांच्या सहकाऱ्यांना आदरांजली अर्पण केली. सकाळपासून इमाम हुसेन यांच्या पंजांची शहरातील विविध भागांत गावभेट पार पडली. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता मानाच्या ताबुतांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला.
मिरवणुकीत सर्वप्रथम सातपुडा येथील ताबूत, त्यानंतर बागवान जमातचा ताबूत सहभागी झाला. त्यापाठोपाठ इंदापूरच्या इतिहासात विशेष महत्त्व असलेल्या शेख मोहल्ला आणि कसबा येथील हसन-हुसेन यांच्या मानाच्या ताबुतांचे नेहरू चौकात आगमन झाले. यावेळी ताबुतांसमोर राजू इंगोले यांची उदानाची गाडी आणि नगारागाडी असल्याने वातावरण भक्तिमय झाले.
परंपरेनुसार शेख मोहल्ला आणि कसबा येथील हसन-हुसेन ताबुतांची नेहरू चौकात प्रतीकात्मक भेट घडविण्यात आली. या प्रसंगी उपस्थित भाविकांनी जयघोषाने परिसर दुमदुमून सोडला. या दोन्ही मानाच्या ताबुतांचे वैशिष्ट्य म्हणजे ते संपूर्ण पांढऱ्या शुभ्र कापडापासून तयार केले जातात. एक ताबूत तयार करण्यासाठी सुमारे १५० ते २०० मीटर कापड लागते. अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली जात असल्याने या ताबुतांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते.
नेहरू चौकातील भेटीनंतर दोन्ही ताबूत एकत्र मुख्य मार्गाने खडकपुरा येथील शिवाजी चौकात पोहोचले. तेथे विधिवत फातेहखानी झाल्यानंतर ताबूत आपापल्या मार्गाने रवाना झाले. पुढील वर्षी पुन्हा याच पारंपरिक पद्धतीने त्यांची भेट घडते. यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा, गटनेते शकील सय्यद, नगरसेवक उमेश मखरे, शुभम पवार, अक्षय सूर्यवंशी, आरशाद सय्यद आदींनी विविध ताबुतांना भेटी दिल्या. नेहरू चौकात माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत नागरी संघर्ष समितीच्या वतीने मानाच्या ताबुतांचे स्वागत करण्यात आले.
कृष्णा ताटे, हमीद आतार, महादेव चव्हाण, चंद्रकांत देवकर, अशोक अनपट आणि गजानन पवार उपस्थित होते. मोहरम समितीचे इब्राहीम शेख, अय्याज शेख, दादा इनामदार, बाबाजान शेख, मुख्तार सय्यद आणि फिरोज पठाण यांनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संपूर्ण मिरवणुकीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवला.











