राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील गिरीम येथील दोन महिलांच्या डोक्यावर वाढलेल्या केसाच्या जटा आज निघाल्या आणि डोक्यावरचा अंधश्रध्देचा डोंगरही कायमचा निघाला..अंनिसच्या पुढाकारातून या महिलांच्या आयुष्यात नवी सकाळ उगवली.. अर्थात एका महिलेच्या पतीनेच यात पुढाकार घेतला, हे विशेष!
याचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज फेसबुक पेज वर पाहू शकता..
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदीनी जाधव यांनी गिरीममधील महिलेचे केस कापून तिला या अंधश्रध्देतून मुक्त केले. विशेष म्हणजे त्या महिलेल्या पतीनेच यासाठी पुढाकार घेतला. अंधश्रध्दा निर्मुलन समितीने आता पर्यंत 174 महिलांच्या डोक्यातीवरील जटांचा भार उतरवला आहे.
ग्रामीण भागात एकविसाव्या शतकातही समाजात आजही अनेक प्रकारच्या अंधश्रध्दा आहेत. अंधश्रध्देचे भूत एकदा माणसात शिरले की, ते निघता निघत नाही. त्यातून शिक्षितही सुटले नाहीत, मात्र मागील अनेक वर्ष महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती या व्यवस्थेविराधात मैदानात उतरून या अंधश्रध्देला मुठमाती देण्याचे काम करीत आहे.
दौंड तालुक्यातील गिरीम येथील दोन महिलांच्या डोक्यावर मागील पाच वर्षापासून केसाच्या जटा वाढल्या होत्या. यापैकी एका महिलेच्या पतीनेच थेट नंदिनी जाधव यांच्याशी संपर्क साधला व या जटा काढून टाकण्याची मानसिकता स्पष्ट केली. त्यावरून आज शुक्रवारी ( दि. 9 ) अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदीनी जाधव व महाराष्ट अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी गिरीम येथे जावून या महिलेच्या जटा कापून तिला या अंधश्रध्देच्या जोखडातून मुक्त केले. तर तेथील एका महिलेला शेतातील घरी जावून जटा कापून तिला या अंधश्रध्देतून मुक्त केले.
यावेळी धनश्री कांबळे या महिलेने सांगितले की, हे देवाचे आहे असे सांगितले गेल्याने मी भितीपोटी ते काढण्याचे धाडस केले नाही, मात्र अंधश्रध्दा समितीच्या नंदीनी जाधव यांनी मला समजून सांगितले व माझ्या मनातील भिती व अंधश्रध्दा कशी आहे हे पटवून सांगितले आणि माझ्या कुटूंबांनी ही त्याला परवानगी दिली.
याबाबत नंदीनी जाधव म्हणाल्या की, देवाचा आणि जटेचा काही संबंध नाही. अस्वच्छतेमुळे, केस व्यवस्थित विंचरले नाही तर केसांचा गुंता तयार होतो. त्यालाच जटा म्हणतात. ती कापली तर काहीतरी वाईट घडेल असे त्याच्या मनात भीती असते. महिल्यांमध्ये या जटाबाबत मोठी अंधश्रध्दा आहे. देवऋषी, बुवा, महाराजाच्या सांगण्यावरून महिला वर्षानुवर्ष डोक्यात ही जट तशीच ठेवतात. यामुळे महिलांना डोके, मानेला त्रास होतो. शरीरावर मोठा परिणाम होत असतो. यामुळे या जटा वेळेत कापणे जरुरीचे आहे. अलीकडे महिला यास तयार होत आहेत, हे कौतुकास्पद आहे.











