मुंबई, दि. 25 : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर 15 ते 22 जुलै या कालावधीत व्यापक आरोग्य तपासणी व विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. रक्तदान, कर्करोग तपासणी, हाडांची घनता तपासणी तसेच विविध आजारांवरील उपचार व जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिरांवर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत प्रतिबंधात्मक आणि विशेष आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या शिबिरांमध्ये स्तन कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग, मुख कर्करोग तपासणी, हाडांची घनता (बोन मिनरल डेन्सिटी) तपासणी, तंबाखूमुक्ती जनजागृती यासह विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तपासणीनंतर गरजेनुसार उपचार आणि शस्त्रक्रियांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बारामती आणि कोल्हापूर येथे विशेष शिबिरे बारामती आणि कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली लॅप्रोस्कोपिक हर्निया शस्त्रक्रिया व स्थूलता तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच व्हेरिकोज व्हेन्स (अशुद्ध रक्तवाहिन्यांची सूज) डॉप्लर तपासणी व उपचार शिबिर देखील या दोन्ही ठिकाणी होणार आहे.
शिबिरांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, इंटर्न व स्वयंसेवकांचा त्यामध्ये समावेश असेल. यासोबतच स्थूलता, मधुमेह, थॅलेसेमिया, हृदयविकार, स्तनपान, मानव दूध बँक, कृत्रिम अवयव आणि असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती अभियान देखील राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.











