मुंबई : महान्यूज लाईव्ह
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करण्याच्या एका किरकोळ वादावरून एका २२ वर्षीय तरुणाची चालत्या लोकलमध्ये चाकू भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान घडली.
मयंक लोहार (वय २२) असे मृत तरुणाचे नाव असून, तो अंधेरी येथील ‘वेस्टसाईड’ स्टोअरमध्ये कार्यरत होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई करत रोशन सुवर्णा (वय ३०) या आरोपीला पनवेलमधून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री गोरेगाव ते कांदिवली दरम्यान लोकल प्रवास करत असताना मयंक आणि आरोपी रोशन सुवर्णा यांच्यात लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून किरकोळ बाचाबाची झाली. मात्र, हा वाद अचानक विकोपाला गेला आणि त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. याच दरम्यान रागाच्या भरात आरोपी रोशनने जवळ असलेला चाकू काढून मयंकच्या पोटात गंभीर वार केले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयंकला तातडीने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गुन्हा केल्यानंतर आरोपी रोशन सुवर्णा बोरीवली स्थानकावर उतरला आणि रिक्षाने थेट आपल्या घरी पोहोचला. तिथे त्याने जेवण केले आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी तो पनवेलला पळून गेला. तिथून तो थेट कर्नाटकला पळून जाण्याच्या तयारीत होता.
४०० सीसीटीव्ही आणि १०० पथके; पोलिसांचं मेगा सर्च ऑपरेशन..
घटनेचे गांभीर्य ओळखून लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आरोपीचा माग काढण्यासाठी २५ पोलीस अधिकारी आणि ७० हून अधिक कर्मचारी मैदानात उतरले. १०० विशेष पथके तयार करण्यात आली. रेल्वे आणि परिसरातील तब्बल ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. या मोठ्या मोहिमेनंतर पोलिसांनी आरोपी रोशनला पनवेलमधून बेड्या ठोकल्या.
माझ्या मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी उद्विग्न मागणी मयंकचे वडील रमेश लोहार यांनी केली आहे. या घटनेवर बोलताना पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, “प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकल आणि स्थानकांवर सीसीटीव्ही, अलार्म चेन, पॅनिक बटणे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनात करण्यात आली आहे. जखमी प्रवाशाला तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली होती, पण दुर्दैवाने त्याचा जीव वाचू शकला नाही.” या घटनेमुळे मुंबई लोकल मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि वाढत्या रेल्वे रेज (Train Rage) चा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.











