सोलापूर : बार्शी तालुक्यातील हत्तीज येथे एका मुख्याध्यापकाने पत्नी व दोन मुलांना विष पाजून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील (वय 40-45) हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यासह पत्नी माधुरी पाटील (37), मुलगा अथर्व पाटील (11) आणि शिवांश पाटील (9) यांचा मृत्यू झाला आहे.
प्राथमिक तपासानुसार, योगेश पाटील यांना शेअर बाजारातील व्यवहारांमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी सुमारे 1 कोटी 80 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होत गेल्याने ते तीव्र मानसिक तणावाखाली होते.
गुरुवारी रात्री त्यांनी पत्नी व दोन मुलांना विष पाजून स्वतःही आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे आर्थिक तणाव, कर्जबाजारीपणा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेअर बाजारातील जोखमीचे व्यवहार आणि त्यातून निर्माण होणारे आर्थिक दडपण किती गंभीर परिणाम घडवू शकते, याचे हे विदारक उदाहरण मानले जात आहे.











