पुणे : महान्यूज लाईव्ह
प्रशांत महासागरात ‘एल निनो’ पूर्णपणे सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकी हवामानशास्त्र संस्था ‘नोआ’च्या (NOAA) ‘क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर’ने (CPC) केली आहे. यंदाचा एल निनो हा तब्बल १९५० नंतरचा म्हणजेच गेल्या ७५ वर्षांतील सर्वाधिक तीव्र आणि भीषण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या घडामोडींमुळे भारतीय उपखंडात, विशेषतः महाराष्ट्रात मान्सूनवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.
एल निनो सक्रिय झाल्यामुळे जागतिक हवामान चक्रात मोठे बदल होणार आहेत. भारताच्या दृष्टीने याचे काही प्रमुख परिणाम दिसून येतील. यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. एल निनोच्या तीव्र स्थितीमध्ये भारतीय उपखंडात पाऊस सरासरीपेक्षा कमी होतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाचा पाऊस सरासरीच्या ९०% (५% कमी-अधिक) राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
प्रादेशिक विषमता आणि दुष्काळाचा धोका: पावसाचे प्रादेशिक वितरण असमान राहील. ज्या भागात आधीच कमी पाऊस पडतो, तिथे पाऊस आणखी घटल्यास तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
सीपीसीने जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, गेल्या महिनाभरात प्रशांत महासागरातील न्यूट्रल (सामान्य) स्थिती संपून एल निनोने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. चालू वर्षाच्या डिसेंबर महिन्यात हा एल निनो ‘अतितीव्र’ (Super El Nino) स्वरूप धारण करेल. धक्कादायक बाब म्हणजे, याचा प्रभाव केवळ चालू वर्षापुरता मर्यादित नसून, फेब्रुवारी २०२७ मध्येही हा एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजेच २०२७ च्या पूर्वार्धापर्यंत जगाला आणि भारताला या हवामान बदलाचा सामना करावा लागणार आहे.
मान्सूनच्या वाटचालीत खंड पडणार आहे. जूनच्या सुरुवातीलाच एल निनो सक्रिय झाल्यामुळे जुलै आणि ऑगस्ट या मुख्य महिन्यांमध्ये मान्सूनच्या प्रवासात मोठे ‘ब्रेक’ (दीर्घ विश्रांती) येण्याची शक्यता आहे. संपूर्ण मान्सून हंगामच या प्रभावाखाली राहील. सध्या देशात मान्सूनची गती मंदावली असून तो लांबला आहे. यामागे एल निनोची अप्रत्यक्ष भूमिका असल्याचे दिसून येत आहे.
१. ‘एमजीओ’ (MJO – Madden Julian Oscillation) चा अडथळा : मान्सून सक्रिय करण्यासाठी विषुववृत्ताजवळ असणारे ढगांचे क्षेत्र (MJO) पूर्वेकडे सरकणे गरजेचे असते. परंतु, एल निनो विकसित होत असल्यामुळे हे क्षेत्र हिंदी महासागराकडे न येता प्रशांत महासागरावरच स्थिरावले आहे. जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे क्षेत्र भारतीय उपखंडाकडे येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला आखाती देशांकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांनी मान्सूनची पुढची वाटचाल रोखून धरली आहे. एल निनो सक्रिय झाल्यामुळे या कोरड्या वाऱ्यांचा जोर वाढला असून मान्सूनच्या प्रगतीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
हवामान शास्त्रानुसार, जेव्हा प्रशांत महासागराच्या समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा २ ते २.५ अंश सेल्सिअसने वाढते, तेव्हा त्याला ‘अतितीव्र’ किंवा ‘सुपर एल निनो’ म्हटले जाते. काही मॉडेल्सनी हे तापमान ३ अंशांपेक्षा जास्त वाढण्याचा अंदाज दिला असला, तरी सीपीसीच्या मते हा १९५० नंतरचा सर्वात तीव्र एल निनो असेल हे आता स्पष्ट झाले आहे. एल निनोच्या या अतितीव्र रूपामुळे यंदाचा मान्सून हंगाम अत्यंत आव्हानात्मक आणि अनिश्चिततेचा राहणारा आहे. शेतीचे नियोजन आणि पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासनाला आणि शेतकऱ्यांना आतापासूनच सतर्क राहावे लागणार आहे.










