विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामती नगरपरिषदेची १२ जून २०२६ रोजी होणारी सर्वसाधारण सभा नागरिकांना थेट पाहता यावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अॅड.सुधीर शरद पाटसकर यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यूट्यूब, फेसबुक किंवा नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून सभेचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीमिंग) करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी ॲड. भार्गव पाटसकर, अँड निलेश वाबळे, प्रीतम तपकीर उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये लोकप्रतिनिधींकडून शहराच्या विकासाशी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जातात. मात्र या चर्चांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मर्यादित स्वरूपात पोहोचते. त्यामुळे सभेचे थेट प्रक्षेपण झाल्यास नागरिकांना सभागृहात नेमकी कोणती चर्चा होत आहे, कोणते विषय मांडले जात आहेत आणि त्यावर लोकप्रतिनिधींची भूमिका काय आहे,हे प्रत्यक्ष पाहता येईल.
यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होईल.नागरिकांचा स्थानिक कामकाजात सहभाग वाढविण्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, मुंबई महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका यांसारख्या मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसाधारण सभांचे थेट प्रक्षेपण केले जाते. या पद्धतीमुळे नागरिकांना कामकाजाची माहिती मिळण्यास मदत झाली असून लोकशाही व्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. त्यामुळे बारामती नगर परिषदेतही अशाच प्रकारची व्यवस्था लागू करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
सर्वसाधारण सभा ही सार्वजनिक स्वरूपाची असल्याने तिचे चित्रण किंवा थेट प्रक्षेपण करण्यास कोणताही कायदेशीर अडथळा नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उलट अशा माध्यमातून नागरिकांचा विश्वास वाढण्यास मदत होईल,असा दावा मनसेने केला आहे. लोकशाही मूल्ये, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने १२ जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती अॅड.सुधीर शरद पाटसकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.











