बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील एका युवकाचा मृतदेह निरा डावा कालव्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काल (रविवारी) दुपारनंतर घरातून बाहेर पडलेले वैभव चंद्रकांत सकट हे बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान कालव्यात आढळून आल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव सकट हे काल सायंकाळी चार वाजल्यापासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. आज सकाळी निरा डावा कालव्यात एका युवकाचा मृतदेह दिसून आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाअंती मृत व्यक्तीची ओळख वैभव सकट अशी पटली.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेला वेगळे वळण देत वैभव सकट यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. सावकारीच्या जाचक त्रासामुळे आणि आर्थिक दबावामुळेच वैभव यांनी टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. काही व्यक्तींकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे वैभव तणावाखाली होते, असेही नातेवाईकांचे म्हणणे आहे.
कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत, सावकारीशी संबंधित सर्व बाबींचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच आपल्या मुलाच्या मृत्यूमागील सत्य बाहेर आणून न्याय मिळवून द्यावा, अशी भावनिक विनंती त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.
प्रथमदर्शनी ही आत्महत्येची घटना असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी मृत्यूमागील नेमके कारण, सावकारीचा कथित संबंध आणि इतर सर्व बाबी पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे या घटनेकडे बारामती तालुक्यासह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.











