राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यात अवैध गर्भपाताच्या घटनांची मालिका उघड होत आहे. यापाठोपाठ आता केडगाव येथील लवंगारे मॅटर्निटी अँड इन्फर्टिलिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर स्वाती लवंगारे यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्त्रीरोगतज्ञ नसतानाही गर्भपाताच्या गोळ्यांचा बेकायदा साठा करून गर्भपात केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात राजकीय नेत्याच्या आशीर्वादामुळे पूर्वीच्या तक्रारी दाबल्या गेल्याचा गंभीर आरोपही होत आहे.
दौंड ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गुजर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. स्वाती लवंगारे (रा. केडगाव ) आणि डॉ. तुकाराम यशवंत मोटे (रा. उरुळी कांचन ता. हवेली ) यांनी 6 जून 2026 रोजी गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा करून अवैध गर्भपात केला. तसेच गर्भपाताच्या गोळ्या रुग्णांना दिल्या असल्याचे नोंदीत डॉ. तुकाराम मोटे यांची सही आढळली आहे.
वरवंड येथील एका स्थानिक बड्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने डॉ. लवंगारे यांनी मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपात केल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या होत्या, असा आरोप तक्रारीत आहे. मात्र राजकीय दबावामुळे त्या तक्रारी जागीच मिटवल्या जात होत्या. काही वेळा धमक्या देऊन, तर काही वेळा पैशाचे आमिष दाखवून तक्रारदारांना गप्प केले जात होते, असा गंभीर आरोप आहे. डॉ. लवंगारे या स्त्रीरोगतज्ञ नसताना गर्भपात करणे आणि गर्भपाताच्या गोळ्यांचा बेकायदा साठा करणे हे गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र PCPNDT कायद्याचे उल्लंघन आहे. या कायद्यानुसार गर्भलिंग निदान आणि अनधिकृत गर्भपात ही दखलपात्र बाब आहे.
या गुन्ह्यामुळे दौंड तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचे पितळ आता उघडे पडू लागले आहे. या घटनेनंतर नागरिक आणि महिला संघटनांनी अशा डॉक्टरांवर कठोर कारवाई करून त्यांचे हॉस्पिटल सील करण्याची मागणी केली आहे.
यवत पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांविरोधात BNS आणि PCPNDT कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. डॉक्टर लवंगारे आणि डॉक्टर मोटे यांना त्वरित अटक करून त्यांच्या क्लिनिकमधील कागदपत्रे, गोळ्यांचा साठा जप्त करण्यात यावा. अशी मागणी होत असुन या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, राजकीय नेत्याचे नाव समोर येईल का याचा तपास सुरू आहे. दौंड तालुका गर्भपाताच्या घटनांमुळे सलग दुसऱ्यांदा चर्चेत आला आहे. आता प्रशासन आणि पोलीस या रॅकेटचे मूळ उखडून काढतील का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.











