राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
सोशल मीडियाच्या माध्यमातून उदयास आलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) ने महाराष्ट्रातील संघटनात्मक विस्ताराला सुरुवात करत राज्यातील पहिली महत्त्वाची बैठक दौंड तालुक्यातील चौफुला येथील बोरमलनाथ मंदिरात रविवारी (दि. 7 जून) आयोजित केली. या बैठकीत पक्षाची महाराष्ट्र राज्य समन्वय समिती जाहीर करण्यात आली असून, पक्षाच्या वाटचालीसाठी संविधानवादी दशसूत्री आचारसंहिता देखील प्रसिद्ध करण्यात आली.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील ही बैठक पार पडल्याने राजकीय वर्तुळात या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. राज्यभर संघटन उभारणी आणि जनसंपर्क मोहिमेची दिशा या बैठकीत निश्चित करण्यात आली.
बैठकीत विक्रांत शंके, जावेदा जिंदगी, दीपक यादव, सौरभ भागवत, आरती घोलप, राहुल काठोळे आणि राजाभाऊ कदम यांची महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी संविधाननिष्ठ विचार, सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाही मूल्ये समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राज्य समन्वयक विक्रांत शंके यांनी सांगितले की, “लवकरच CJP महाराष्ट्रच्या वतीने राज्यव्यापी दौरा आयोजित करण्यात येणार आहे. या दौऱ्यात संघटन विस्तार, सदस्य नोंदणी मोहीम आणि जनसंवाद कार्यक्रम राबवले जातील. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याशी चर्चा करून पुढील रणनीती निश्चित केली जाईल.”
पक्षाने जाहीर केलेली संविधानवादी दशसूत्री आचारसंहिता ही भारतीय संविधान, मानवी मूल्ये, सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित असल्याचे सांगण्यात आले. युवक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले. दिल्लीतील आंदोलनानंतर महाराष्ट्रातील पहिली मोठी संघटनात्मक बैठक दौंड तालुक्यात पार पडल्याने आगामी काळात CJP च्या राजकीय आणि सामाजिक उपक्रमांकडे राज्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.










