बारामती : महान्यूज लाईव्ह
पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख जिथे जिथे असतात, तिथे सिंघम स्टाईल कारवाई असते.. काहीच खपवून घ्यायचे नाही हा इरादा पक्का असलेल्या अभिनव देशमुख यांनी नियक्ती होताच वाळूमाफियांचे कंबरडे मोडण्याचा सपाटा लावला. आज बारामतीत गेल्या काही वर्षांपासून बिनबोभाट सुरू असलेले ऑनलाईन सेंटरचे जाळे उध्वस्त केले. पाच ऑनलाईन लॉटरी सेंटरवर कारवाई करीत जुगाराचा मोठा अड्डा उध्वस्त केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली बेकायदेशीर जुगाराचे अड्डे चालवले जात असलेल्या बारामती शहरात नीरज ऑनलाईन लॉटरी सेंटर, खंडोबानगर येथील राजश्री लॉटरी, श्रीराम गल्ली येथील दिक्षीत ऑनलाईन लॉटरी सेंटर, भाजी मंडईतील स्कील गेम लॉटरी सेंटर व स्वामी समर्थ स्कील गेम लॉटरी सेंटरवर धाड टाकली. या पाच ठिकाणी मिळून रोख रकमेसह ३ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी गोपाल राधाकिशन शर्मा (देसाई इस्टेट, जळोची बारामती), सुनील लष्कर ( रा. कुरवली रोड फलटण), संकेत पुरूषोत्तम दिक्षीत, तुषार माणिक लोंढे ( दोघे रा. कोष्टी गल्ली) मनोज सोनवले व सतीश विठ्ठल सूर्यवंशी (रा. शंकर भोई तालीम संघ नजिक बारामती) यांच्यावर जुगार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करण्यात आली.
आज एकाच दिवसात दौंड तालुक्यात सेक्स रॅकेट तर बारामतीत ऑनलाईन जुगार अड्डे उध्वस्त केलेल्या या कारवाईत बारामतीत फौजदार अमोल गोरे, शिवाजी ननवरे, सहायक फौजदार राजेंद्र थोरात, श्रीकांत माळी, हवालदार अनिल काळे, रवीराज कोकरे, ज्ञानदेव क्षीरसागर, रौफ इनामदार, काशिनाथ राजपुरे, प्रविण मोरे, प्रसनजीत घाडगे आदींच्या पथकाने सहभाग घेतला. पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.










