इंदापूर – राज्यात झालेल्या पूर्वमौसमी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
पाहणीदरम्यान कृषिमंत्री भरणे यांनी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच नुकसानीचा अहवाल शासनाकडे प्राप्त होताच बाधित शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बोलताना मंत्री भरणे म्हणाले की, राज्यातील २४ जिल्ह्यांना गारपीट, वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा फटका बसला असून साधारण एक लाख एकरांहून अधिक शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने जोपासलेली पिके काही तासांत उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, त्या सर्व भागांतील पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कृषिमंत्री भरणे यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक मूल्यांकन करून मदत प्रस्ताव त्वरित पाठवण्यास सांगितले असून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही व्यक्त केला.











