बारामती : महान्यूज लाईव्ह
सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळाखडेवाडी (ता. बारामती) येथे बकरीपालन व्यवसायासाठी ठेवण्यात आलेल्या शेळ्या व बोकड चोरीस गेल्याच्या गुन्ह्याचा सुपा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा करत आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेला सुमारे 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
याबाबत रामचंद्र यदु शेंडगे (वय 50) यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 111/2026 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुपा पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील माहिती संकलित केली. तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला. या तपासात सौरव संजय सूर्यवंशी (वय 24, रा. शिंदे वस्ती, लोणी भापकर, ता. बारामती) याच्यावर संशय निर्माण झाल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान सूर्यवंशी याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर केलेल्या तपासात चोरीस गेलेला मुद्देमाल त्याच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून चार करडे, दोन पाटी आणि एक बोकड असा एकूण सुमारे 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फिर्यादी यांनीही जप्त करण्यात आलेल्या जनावरांची ओळख पटवून दिली आहे.
या यशस्वी कारवाईमुळे बकरीपालक शेतकऱ्याला दिलासा मिळाला असून सुपा पोलिसांच्या तत्पर तपासाचे कौतुक होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुणे ग्रामीण पथकातील पोलीस अंमलदार किसन तांडगे, महादेव साळुंखे, सोमनाथ होले आणि भाऊ चौधरी यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंखे करीत आहेत.











