‘विश्वास’ मिळवा कोरोनाशी लढण्याचा या उपक्रमास सांगली जिल्ह्यात उदंड प्रतिसाद
आज जागतिक मानसिक ताण तणाव प्रतिबंध दिन
सांगली जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय व येथील शुश्रुषा सल्ला मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेने हाती घेतलेल्या हेल्पलाईन वर रोज 100 हून अधिक कोविड रुग्णांशी मानसतज्ज्ञांचा संवाद होत आहे. याखेरीज 15 हजार नागरिकांचे सोशल मिडियाद्वारे मानसिक स्वास्थ्य विषयक प्रबोधन सुरू असल्याची माहिती मानसतज्ञ कालिदास पाटील यांनी दिली.
उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना मानसतज्ञ पाटील म्हणाले, वाढत्या कोरोना आपत्तीमुळे नागरिकांमध्ये कौटुंबिक, आर्थिक, व्यावसायिक प्रश्न निर्माण होत आहेत. यातून निर्माण झालेल्या ताण- तणावांना सामोरे जाता येत नसल्याने समाजातील सर्व घटकांचे मानसीक स्वास्थ्य हरवत असल्याचे सिद्ध झाले आहे. इस्लामपूर येथील शुश्रुषा सल्ला मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेने एप्रिल, मे, जून महिन्यातील लॉक डाउन परिस्थितीमध्ये 9 हजार 85 कुटुंबातील मानसीक स्वास्थ्य बिघडलेल्या 2 हजार 856 व्यक्ती मधील मानसिक लक्षणांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात भीती, अकारण काळजी ५५ टक्के, चिंता व ताण तणाव ४१ टक्के, अस्वस्थता, उदासीनता ६२ टक्के चिडचिडेपणा, राग व आक्रमकता ८५ टक्के तर एकाकीपणा, सहन न होणे अशा तक्रारी ४६ टक्के व्यक्तीमध्ये दिसून आल्या आहेत.
याशिवाय झोप, भुकेच्या तक्रारी, नकारात्मक विचार, मानसीक थकवा, मनोकायिक त्रास वाढले असल्याचे मानस तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून हाती घेतलेल्या “जागर जाणिवांचा, उमेद नव्या आयुष्याची” या प्रकल्पांतर्गत केलेल्या या विशेष मानसशास्त्रीय सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच शुश्रुषा संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला असल्याची माहिती ही मानसतज्ञ कालिदास पाटील यांनी दिली.
शुश्रुषा ने सादर केलेल्या अहवालाची जिल्हा प्रशासनाने व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गाभिर्याने दखल घेऊन विश्वास मिळवा कोरोनाशी लढण्याचा.. हे विशेष अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यातील लोकांची कोरोनविषयीची अकारण भीती, निराशा, ताण तणावातून घडणाऱ्या आत्महत्या यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू केलेल्या हेल्पलाईन वर एका आठवड्यामध्ये तीनशेहून अधिक लोकांनी मानसीक आधाराची व मदतीची मागणी केली आहे.
यामध्ये वृद्ध व्यक्तींचा अधिक समावेश आहे. आजार व मृत्यू विषयीची भीती, झोपेच्या तक्रारी, कुटुंबियांच्या भविष्याची काळजी, आर्थिक ताण अशा समस्यांवर रोज १०० हून अधिक लोकांना मानस तज्ञ विविध प्रकारे समुपदेशन करीत आहेत. तर या योजनेचा प्रचार, प्रसार, मानसीक आरोग्य प्रबोधन या विषयी सोशल मीडियाद्वारे १५हजारहून अधिक व्यक्तीशी संपर्क साधला जात आहे.
शुश्रुषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था इस्लामपूर या तज्ञ संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली यांचे वतीने हाती घेतलेल्या आपत्ती काळातील मानसिक आरोग्य प्रबोधन, प्रथमोपचार कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये हा एकमेव उपक्रम राबविला जात आहे.
कोरोनामुळे नागरिक हतबल झाले आहेत. चिंता, भविष्याची काळजी, व्यवसायाचे नुकसान यामुळे लोकामध्ये नैराश्य, ताण तणाव, झोपेच्या तक्रारी यांचे तुलनेने महिलांमध्ये अधिक प्रमाण वाढत आहे. लोकांशी हेल्पलाईन द्वारे संपर्क साधला जात आहे. मानसिक आधार देण्यासाठी लवकरच वेबिनार व इतर माध्यमातून प्रबोधन कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत.
डॉ.अभिजित चौधरी,जिल्हा शल्य चकित्सक डॉ.संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणारा हा उपक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. तरी आपल्या मनातील प्रश्नांच्या शास्त्रीय उत्तरासाठी १८००१०२४७१० किवा ९४२२६२७५७१ या हेल्पलाईन वरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
क्रांती गोंधळी, शैलजा पाटील, अक्षय साळुंखे, जस्मिन मुल्ला अभिजित वाटेगावकर आदी मानसतज्ञ कार्यरत आहेत











