मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यात एप्रिलच्या अखेरीस तापमानाने अक्षरशः विक्रमी झेप घेतली असून उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत तापमान ४४ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उष्माघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.
आतापर्यंत जुन्नर, अकोला, लातूर, परभणी, अहिल्यानगर, अमरावती आणि हिंगोली येथे उष्माघातामुळे संशयित मृत्यूंची मालिका समोर आली असून शेतकरी, ऑटोचालक, शिक्षिका, तरुण तसेच ९ महिन्यांच्या बाळालाही जीव गमवावा लागला आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका महिला शेतकऱ्याचा शेतात काम करताना मृत्यू झाला. दुपारच्या कडक उन्हात शेतीकाम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली. कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात उष्माघाताचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
अकोला जिल्हा सध्या देशातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये गणला जात आहे. तापमान ४६ अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशाच परिस्थितीत दिवसभर उन्हात ऑटो चालवणाऱ्या एका ऑटोचालकाची प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. प्रशासनाने या घटनेकडे गंभीरतेने पाहत नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एरंडी गावातील महेश लिंबाजी इंगोले (वय २५) हा तरुण शेतकरी शेतातून घरी परतल्यानंतर अचानक कोसळला. कुटुंबीयांनी तातडीने मदत केली मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार हा उष्माघाताचा प्रकार मानला जात आहे. याच भागातील गोंद्री गावात ९ महिन्यांच्या बाळाचाही उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या परिसरात यापूर्वी आणखी दोन संशयित मृत्यू नोंदवले गेले आहेत.
परभणी जिल्ह्यातील नांदखेडा रोड परिसरात ३७ वर्षीय शिवाजी बबन कांबळे यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ते नातेवाईकांकडे जात असताना तीव्र उन्हामुळे त्यांना चक्कर आली आणि ते रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. शरीरावर त्वचा करपल्याच्या खुणा आढळल्याने उष्माघाताची शक्यता अधिक बळावली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील धवलपुरी येथील हर्षदा चौधरी (वय ४५) या शिक्षिका दुपारच्या उन्हात शेतात चारा कापत असताना कोसळल्या. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राज्यातील सुरुवातीच्या संशयित उष्माघात मृत्यूंपैकी ही एक घटना मानली जात आहे.
अमरावतीतही तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पुढे गेल्याने एका व्यक्तीचा संशयित उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यात ३० वर्षीय तरुणाचा उष्णतेमुळे मृत्यू झाला असून सलग वाढणारे तापमान, बाहेरचे श्रम आणि शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मार्च ते एप्रिलदरम्यान राज्यात ३० हून अधिक उष्माघाताची प्रकरणे नोंदवली गेली असून अनेक संशयित मृत्यूंची चौकशी सुरू आहे. विशेषतः शेतकरी, मजूर, वाहनचालक, बांधकाम कामगार, वृद्ध आणि लहान मुले यांना सर्वाधिक धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाने नागरिकांना सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर पांढरे कापड किंवा टोपी वापरावी, ओआरएसचे सेवन करावे आणि लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
राज्यातील वाढती उष्णता ही केवळ हवामानातील बदलाची नोंद नसून आता ती थेट जीवघेणी ठरत असल्याचे या घटनांमधून स्पष्ट होत आहे. उष्णतेचा हा कहर थांबवण्यासाठी केवळ प्रशासन नव्हे तर प्रत्येक नागरिकानेही सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे.











