दौलतराव पिसाळ, वाई
वाई तालुक्यातील नागेवाडी येथे दिरानेच सख्या भावजयीचा धारदार गुप्तीने भोसकून खून केल्याची थरारक घटना आज (दि. २८) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे नागेवाडी गावासह संपूर्ण वाई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सौ. गीताबाई चंद्रकांत यादव (वय ५८) असे मृत महिलेचे नाव असून भिकू विठ्ठल यादव (वय ६०, रा. नागेवाडी, ता. वाई, जि. सातारा) असे आरोपीचे नाव आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने राहत्या घरातच गुप्ती या धारदार हत्याराने गीताबाई यांच्या पोटात वार करून त्यांचा निर्घृण खून केला. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिस ठाण्याचे डीबी विभाग प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांनी वरिष्ठ अधिकारी डिवायएसपी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना कळवून तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस पथकाने तातडीने नागेवाडीत पोहोचून आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी पाठलाग करून वाई-पाचगणी रस्त्यावरील १६ नंबर बसथांब्यावर सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी वाई ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वाई पोलीस करत आहेत.











