डॉ. महेश घोळवे : महान्यूज स्पोर्ट्स अपडेट
मुंबई इंडियन्स ने आयपीएल मधील आपली विजयाची घोडदौड सुरूच ठेवली आहे. काल राजस्थान रॉयल विरुद्ध झालेल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवत मुंबईने आपणच दादा असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. अव्वल धावगती व गुणांच्या जोरावर मुंबई पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानी जाऊन पोहोचली, तर राजस्थानची सातव्या क्रमांकावर घसरण झाली.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स ने 20 षटकात 193 धावांचा विशाल डोंगर उभा केला. सूर्यकुमार यादवने तुफानी फटकेबाजी करत नाबाद 79 धावा बनवल्या. राजस्थान कडून गोपांलने दोन तर आर्चर व त्यागी यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरवात अतिशय सुमार झाली. पहिल्या तीन विकेट झटपट बाद झाल्यानंतर बटलरने एकाकी झुंज सुरू ठेवली. परंतु शेवटी त्याच्या 70 धावा राजस्थानला मोठ्या पराभवापासून वाचू शकल्या नाहीत आणि शेवटी राजस्थानचा 47 धावांनी नामुष्कीजनक पराभव झाला. बुमराहने आपल्या शैलीस साजेशी गोलंदाजी करत चार षटकात 20 धावांच्या मोबदल्यात 4 बळी मिळवले. तुफान फटकेबाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादव ला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मुंबईचा हा सलग तिसरा विजय होता तर राजस्थान सलग तीन पराभवामुळे बॅकफूटवर गेली आहे.











