शारदानगर : महान्यूज लाईव्ह
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि शारदा महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १८ वर्षांपासून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला जात असून, यंदाही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शारदानगर येथे सन्मान करण्यात आला. अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडलेल्या ‘शारदा सन्मान सोहळ्या’त राज्यातील विविध भागांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.

‘Give To Gain’ या यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या थीमनुसार महिलांना संधी आणि पाठबळ दिल्यास समाज अधिक सक्षम होतो, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. ढोल पथकाच्या गजरात मान्यवर व सत्कारमूर्तींचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार व सौ. कुंतीताई पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन झाले.

प्रास्ताविकात सौ. सुनंदाताई पवार यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, आरोग्य विमा काढण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. कॅन्सरसारख्या आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता महिलांनी सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणींनी पोलीस प्रशिक्षण, नर्सिंगसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम घेऊन स्वावलंबी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या दीप्ती गोपाल नायर (संस्थापक, युगांतर अकॅडमी, पुणे) यांनी आपल्या मनोगतात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ‘डार्क सायकोलॉजी’च्या वाढत्या प्रभावाबाबत जागरूक राहण्याची गरज अधोरेखित केली. मुलींशी कुटुंबामध्ये संवाद वाढवणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि गरज भासल्यास समुपदेशन घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी राज्यातील विविध जिल्ह्यांतील शिक्षण, सामाजिक कार्य, उद्योजकता, आरोग्य, शेती अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना ‘शारदा सन्मानपत्र’ देऊन गौरविण्यात आले. सत्कारमूर्तींचा परिचय पीपीटीद्वारे सादर करण्यात आला. गुणवंत विद्यार्थिनींच्या हस्ते औक्षण करून साडी-चोळी, सन्मानपत्र आणि रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास बारामती, इंदापूर, दौंड, पुणे, मुंबई, सातारा, अमरावती, नाशिक, सोलापूर आदी ठिकाणांहून सुमारे २०७५ महिला उपस्थित होत्या. भीमथडी परिसरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नऊ महिला बचत गटांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. सुनंदा पवार यांच्या प्रेरणेतून सुमारे ५००० महिलांचा ‘न्यू इंडिया इन्शुरन्स’ कंपनीमार्फत आरोग्य विमा उतरवण्यात आला असून, या योजनेचा शुभारंभही याच वेळी करण्यात आला. या संदर्भात ज्ञानेश्वर रायते यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती देत अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या सातपुते, चारुशीला कदम आणि पूजा गोवेकर यांनी केले, तर आभार गार्गी दत्ता यांनी मानले.











